Mumbai Rain Record: मुंबईतील पावसाने मोडला 65 वर्षातला विक्रम, आतापर्यंत झाली 3453 मिमी पावसाची नोंद
File image of rains in Mumbai | (Photo Credits: PTI)

सर्वसाधारण मे अखेरीस पडणारा पाऊस यंदा चक्क 3 महिने उशिराने सुरु झाला. दडी मारून बसलेल्या मुंबईवर मोठं पाणीकपातीचे संकट येणार की काय असा प्रश्न मुंबईकरांना पडलेला असताना अचानक जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुंबईकरांवर आलेले पाणीटंचाईचे संकट टळलं. त्यानंतर जो पाऊस कोसळला त्याची तीव्रता इतकी होती की, त्याने मागील 65 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढीत नवा विक्रम केला. टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये जुलैपासून 15 सप्टेंबरपर्यंत 3453 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाचा मुंबईत पडलेला पाऊस हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस होता. मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राज्य सरकारकडून (State Government) हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

असाच रेकॉर्ड 1954 मध्ये पडलेल्या पावसाने केला होता. ज्यावेळी जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत 3452 मिमी इतका पाऊस पडला होता. मात्र यंदाचा पाऊस हा 1954 मध्ये पडलेल्या सरासरी पावसापेक्षा जास्त आहे. दक्षिण पश्चिम मौसमी वा-यांमुळे साधारण जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस पडतो. जो कधी कधी जुलै मध्ये जोर पकडतो. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान उत्तर पूर्व मोसमी वा-यांमुळे पाऊस पडतो. हेही वाचा- Maharashtra Monsoon Forecast Update 2019: मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

याआधी 1954 मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असली तरीही 26 जुलै 2005 ला केवळ एकाच दिवशी 944 मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच येत्या 20-21 सप्टेंबरला मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र त्याबाबत अजून निश्चित माहिती हाती आलेली नाही अशी माहिती IIT बॉम्बेचे प्राध्यापक श्रीधर बालसुब्रमण्यम यांनी सांगितले आहे.

सततच्या संततधार पावसाने मुंबईकरांना अक्षरश: वीट आणला येत्या 24 तासांत मुंबईत (Mumbai) मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने (Skymet) वर्तविली आहे. तसेच विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण (Konkan), गोवा (Goa) या भागातही मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.