Maharashtra Monsoon Forecast Update 2019: मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता
Image used for Representational Purpose only | (Photo Credits: PTI)

सततच्या संततधार पावसाने मुंबईकरांना अक्षरश: वीट आणला येत्या 24 तासांत मुंबईत (Mumbai) मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने (Skymet) वर्तविली आहे. तसेच विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण (Konkan), गोवा (Goa) या भागातही मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी सततच्या रीप-रीप पावसाने मुंबईकर कंटाळले असून 'जा रे जा रे पावसा, येऊ नको दिवसा' असं म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे. त्यामुळे पावसाने आता पूर्णपणे विश्रांती घ्यावी असच लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

तसेच गुजरातच्या दक्षिण भागावर एक चक्रवाती परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्राच्या किनारी भागांवर उष्ण वारे वाहत आहेत. यामुळे येणा-या 24 तासांत मुंबईसह उत्तर कोकण व गोव्यात, तसेच दक्षिण कोकण व गोव्यात हलक्या सरी बरसण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील अंतर्गत भागात म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. थोडक्यात येत्या 24 तासांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून मुसळधार पावसाचा शक्यता तूर्तास तरी दिसत नाहीए. ढगाळ वातावरण असले तरीही मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. हेही वाचा- Mumbai Rains Update: मुंबई,ठाणे परिसरात मुसळधार पाऊस; सखल भागात पाणीच पाणी

2 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या पावसाने बुधवारी चांगलाच जोर धरला. यामुळे मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि मुंबई उपनगरांतील रस्त्यांवर तसेच रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. यामुळे रेल्वे वाहतूकही ठप्प झाली तर रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. मात्र आता पावसाचा वेग थोडा कमी झाली असून येत्या 24 तासात महाराष्ट्रातील पावसाचे स्वरुप हे सर्वसाधारण असेल.