मुंबई: लोकल रेल्वे च्या प्रवाशांवर फटकेबाजी करणा-यांना लगाम घालण्यासाठी उभारण्यात येणार 'वॉच टॉवर'
Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईत रोज लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांचा संख्या काही कमी नाही. या प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यात चोरी-मारी, महिलांशी गैरवर्तणूक, रेल्वेचा मेगाब्लॉक अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात रेल्वेच्या दरवाजावर उभ्या राहणा-या प्रवाशांवर फटके मारून त्यांचे मोबाईल्स, पाकिट मारणे अशा प्रकारचे गुन्हे वाढत चालले आहेत. अशा घटनांना विशेष करुन या फटकेबाजांना लगाम घालण्यासााठी रेल्वे प्रशासनाने स्थानकांदरम्यान टेहळणी बुरुज (वॉच टॉवर) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दूरवर नजर ठेवणे सोपे असून संशयास्पद हालचालीवर तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.

मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील अतिसंवेदशील ठिकाणी हे वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे. धावत्या लोकल रेल्वे च्या प्रवाशांवर आसपासच्या परिसरातून फटकेबाजी करणा-यांची संख्या कमी नाही. अशा लोकांना लगाम घालण्यासाठी ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे. ज्यात वॉच टॉवर द्वारे अशा महाभागांवर लक्ष ठेवले जाईल.

हेदेखील वाचा- रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी 'या' सोप्या स्टेप्स जाणून घ्या

धावत्या लोकलवर अनेकदा हल्ला होत असलेली अतिसंवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणांवरील हालचाली टिपण्यासाठी वॉच टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रस्ताव बनवण्यात येत असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर वॉच टॉवरच्या माध्यमातून सतत हल्ला होणाऱ्या ठिकाणांवरील संशयास्पद हालचाली टिपणे शक्य होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कल्याण-टिटवाळासह, पारसिक बोगदा आणि वडाळा-मानखुर्द परिसरात हे वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत. सध्या, स्थानकांदरम्यान अतिसंवेदनशील ठिकाणी सुरक्षा यंत्रणेचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र जमिनीवर असल्याने मर्यादित भागात नजर ठेवली जाते. त्यामुळे गुन्हेगारांकडून नवी ठिकाणे निर्माण होत आहेत. हे टाळण्यासाठी वॉच टॉवरवर सशस्त्र कर्मचाऱ्याला तैनात करण्यात येईल. तसेच रात्रीच्या वेळी नजर ठेवण्यासाठी उच्च क्षमतेचे दिवे आणि दुर्बिण असे साहित्यही या वॉच टॉवरवर असेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.