Mumbai Quarantine: शहरात येणाऱ्यांसाठी 14 दिवस क्वारंटाईन बंधनकारक- मुंबई महापालिका
Mumbai Quarantine | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

तुम्ही सर्वसामान्य नागरिक, सरकारी अधिकारी असा अथवा कुणीही असा. तुम्ही जर मुंबई (Mumbai) शहरात येऊ इच्छित असाल तर, तुम्हाला 14 दिवस क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. होय, मुंबई महापालिकेने क्वारंटाईनबाबत नवे आदेश काढले असून त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल असेही म्हटले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Case) प्रकरणाच्या तपासासाठी बिहार पोलीस दलातील अधिकारी विनय तिवारी हे नुकतेच मुंबईत आले होते. त्यांनाही मुंबई महापालिकने क्वारंटाइन केले होते. त्यावरुन बरेच राजकारण रंगले, आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या. त्यानंतर मुंबई महापालिका (BMC) अधिक कठोर पावले टाकताना दिसत आहे.

क्वारंटाईन सक्तीबाबतच्या आदेशाचे एक पत्रही मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडलवर पाहायला मिळते. कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीने अनेक नागरिक लॉकडाऊन काळात मुंबई शहरातून बाहेर आपापल्या मूळ गावी गेले होते. दरम्यान, अनलॉक सुरु झाल्यानंतर हे नागरिक पुन्हा मुंबईकडे परतत आहेत. यात काही सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. काही ठिकाणी असेही आढळून आले आहे की, काही अधिकारी आपले शासकीय अधिकारी ओळखपत्र दाखवून क्वारंटाईनमधून सूटका मिळवत आहेत. मात्र, यापुढे असे चालणार नाही. जे अधिकारी मुंबईत येतील आणि त्यांना काही कामासाठी घराबाहेर (क्वारंटाईन असताना) पडायचे असेल त्यांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी महापालिकेकडे दोन दिवस आगोदर विनंती करावी, असेही पालिका अदेशात म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Unlock 3: नवी मुंबई महापालिका हद्दीत प्रदीर्घ काळानंतर सुरु झालेले City Malls पुन्हा बंद करण्याचे आदेश)

देशभरामध्ये कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या विचारात घेता मुंबईत सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने मिशन झिरो सुरु केले आहे. तसेच, या पूर्वी चेस द व्हायरस मोहीम राबवली होती. मुंबईतील उच्चभ्रू परिसरासह अत्यंत दाटीवाटीच्या परिसरांमध्येही ही मोहीम राबवली होती. त्यामुळे मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्यात मुंबई पालिकेला यश आलेले दिसते. परिणामी नियंत्रणात येऊ पाहात असलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू नये. यासाठी पालिकेने मुंबईत येणाऱ्यांसाठी 14 दिवसांचे क्वारंटाईन सक्तिचे करण्याची भूमिका घेतलेली दिसते.