Mumbai Power Outage: 'मुंबईमध्ये मागच्यावर्षी वीज जाणे ही मानवी चूक होती, सायबर हल्ल्याचे कोणतेही पुरावे नाहीत'- Union Power Minister RK Singh
Representational Image (Photo credits: PTI)

मुंबईमध्ये (Mumbai) मागच्यावर्षी अचानक काही तासांसाठी वीज गेली (Power Outage) होती. त्यावेळी अनेक गोष्टी ठप्प झाल्या होत्या. यामागे चीनचा सायबर हल्ला (Cyber Attack) हे कारण असावे असे रिपोर्ट माध्यमांमध्ये फिरत होते. मात्र आता केंद्रीय उर्जामंत्री आर.के. सिंग (Union Power Minister RK Singh) यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या चिनी सायबर हल्ल्यामुळे वीज गेली असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की ही एक मानवी चूक होती, ज्यामुळेच मुंबईमधील वीज गेली होती. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, दोन टीम्सनी वीज जाण्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते मानवी चुकांमुळे घडले असल्याचे दिसत आहे.

ते पुढे म्हणाले की, तपासणीत हा सायबर हल्ला नव्हता असे समोर आले आहे. सायबर हल्ला झाल्याचे वृत्त एका टीमने दिले आहे परंतु ते मुंबई ग्रिड बंद करण्याशी संबंधित नव्हते. वीज मंत्रालयाला दिलेल्या अहवालात तज्ज्ञांच्या पथकाने यासाठी कर्मचारी व अधिकारी यांना जबाबदार धरले आहे. महाराष्ट्र ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सायबर हल्ल्यामुळे मुंबईमध्ये अचानक वीज गेली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी ही माहिती दिली आहे. (हेही वाचा: Mumbai Power Outage: मुंबईतील वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरचा अहवाल सादर; वर्तवली Cyber Attack ची शक्यता)

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी राज्याच्या सायबर सेलच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईत वीज जाण्यामागे सायबर हल्ला हे कारण असू शकते. आता आज सिंग म्हणाले की, आमच्या उत्तर आणि दक्षिण भागात लोड डिस्पॅच सेंटरवर सायबर हल्ले झाले परंतु ते आमच्या ऑपरेटिंग सिस्टमपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तसेच हे सायबर हल्ले चीन किंवा पाकिस्तानने केले आहेत, असे म्हणण्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. त्यामुळे काही लोक असे म्हणत आहेत की या हल्ल्यामागे चीन असावा मात्र आम्ही ते सिद्ध करू शकत नाही.

मुंबईत वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासाबाबत विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, ऊर्जा विभागाने याप्रकरणी गठित केलेल्या तांत्रिक तपास समिती आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र सायबरचा अहवालही प्राप्त झाला आहे. विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे या अहवालांच्या अनुषंगाने अधिक माहिती विधानमंडळात सादर केली जाईल.