मुंबई: कोरोना विषाणूमुळे आणखी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी केली होती. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न उत्तम कामगिरी बजावत आहेत. मात्र, कोरोनाशी लढा देत असताना अनेकांना कोरोनाची संसर्ग झाला आहे. यातच मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) कार्यरत असलेले आणखी 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई पोलीसांकडून शोककळा व्यक्त केली जात आहे.

मुरलीधर वाघमारे (Murlidhar Waghmare) आणि भगवान पार्ते (Bhagwan Parte) असे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत. मुरलीधर वाघमारे हे शिवडी पोलीस ठाण्यात एएसआय म्हणून कार्यरत होते. तर, भगवान पार्ते हे शिवजीनगर पोलीस ठाण्यात पीएन म्हणून काम पाहत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, कोरोनाशी झुंज देत असताना आज त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार? ठाकरे सरकारच्या नेत्यांची महत्वाची बैठक

एएनआचे ट्वीट-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पसरले आहे. राज्यात आज आणखी 1 हजार 602 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर, 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 27 हजार 524 चा आकडा गाठला आहे. यापैकी 1 हजार 019 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 हजार 059 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.