Hemant Nagrale | (Photo Credit- Facebook)

सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरण बाहेर आले आणि मुंबई पोलीस (, Mumbai Police) दलात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना पदावरुन हटविण्यात आले. त्या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची नियुक्ती करण्यात आली. हेमंत नगराळे आयुक्त पदावर आल्यापासून मुंबई पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील ( Economic Crime Branch) या आधी 65 अधीकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर सोमवारी (12 एप्रिल) पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या खात्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. या वेळी आर्थिक गुन्हे शाखेतील सुमारे 13 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

मुंबई पोलीस दलात ज्या अधिकाऱ्यांनी पाच किंवा त्याहून अधिक काळ आर्थिक गुन्हे शाखेत सेवा दिली आहे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना पोलीस दलातील प्रशासकिय विभागाने आदेश जारी करताना म्हटले आहे की, अपवादात्मक परिस्थितीत आणि प्रशासकीय निकडीनुसार कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस दलातील आयुक्त स्तरावरील आस्थापना मंडळाने बदल्यांचे आदेश काढले आहेत. (हेही वाचा, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रिपदाचा राजीनामा, काय आहे संपूर्ण प्रकरण, वाचा सविस्तर)

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

  • पोलीस निरीक्षक दिलीप देशमुख (विशेष शाखा)
  • जितेंद्र मिसाळ (संरक्षक व सुरक्षा)
  • विनोद भालेराव (विशेष शाखा)
  • बळीराम धस (वाहतूक)
  • कुंडलिक गाढवे (संरक्षण व सुरक्षा)
  • किरण जाधव (दक्षिण प्रादेशिक विभागाचे सायबर पोलीस ठाणे)
  • सहायक निरीक्षक चंद्रशेखर गायकवाड (वाहतूक)
  • विक्रांत शिरसाठ (एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे)
  • संदीप बडगुजर (वडाळा टीटी)
  • दीपक कदम (मानखुर्द)
  • प्रवीण फणसे (भांडुप)
  • महेश तांबे (पंतनगर)
  • धनंजय देवडीकर (शिवाजीनगर)

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवास्थान असलेल्या अँटिलीया बाहेर जिलेटिनच्या कांड्या भरलेली स्कॉर्पिओ उभी केल्याचे प्रकरण पुढे आले. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याचाच हात असल्याचे पुढे आले आणि खळबळ उडाली. हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर चर्चिले गेले. या प्रकरणाचा एएनआय या केंद्रीय यंत्रणेद्वारे तपास सुरु आहे. असे असले तरी त्याचे जोरदार पडसाद मुंबई पोलीस दलात उमटले. त्यातून आयुक्तांची बदली तर करण्यात आली. परंतू, खात्यांतर्गत बदल्याही मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या.