प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-ANI)

मुंबई (Mumbai ) शहरातील जगप्रसिद्ध हॉटेल ताज (Taj Hotel) पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करुन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन आल्याने मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. हा फोन पाकिस्तानमधील कराची (Karachi ) येथून आल्याची प्राथमिक माहिती आहे. फोनची सत्यता अद्याप पटली नाही. परंतू, कोणताही धोका न पत्करता मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, पाकिस्तानातील कराची येथील स्टॉक मार्केट इमारतीत दहशतवाद्यांनी काल (29 जून 2020) हल्ला केला. यात 11 नागरिक ठार झाल्याची माहिती आतापर्यंत पुढे आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर या फोनचे गांभीर्य वाढले आहे.

या आधीही मुंबईने अनेक वेळा दहशतवादी हल्ले पचवले आहेत. 26 नोव्हेंबर 2008 या दिवशीही मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. मुंबई पोलीस आणि दहशतवादी यांच्यात सुमारे 60 तास चकमक चालली. मुंबई पोलिसांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, या वेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 166 देश विदेशी नागरिक ठार झाले. यात 28 विदेशी नागरिकांचा समावेश होता. तर 300 पेक्षाही अधीक जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध कमालिचे ताणले होते. युद्धजन्य स्थितीही निर्माण झाली होती.

मुंबई पोलीस ट्विट

दरम्यान, 26/11 च्या हल्ल्यातील एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या कसाब याच्या चौकशीत पुढे आले की, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता. या हल्ल्यातील एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाब याला 21 डिसेंबर 2012 या दिवशी पुणे येथील येरवडा कारागृहात पहाटे फाशी देण्यात आले.