Mumbai: पतंगाच्या मांजामुळे पोलीस अधिकाऱ्याचा चिरला गळा; घालावे लागले 10 टाके, गुन्हा दाखल
Kite Flying | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मकरसंक्रांतीचा सण येताच देशभर पतंग (Kite) उडवण्याची तयारी सुरु होते. या दिवसांत लोक मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पतंग उडवतात. पण पतंग उडण्यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे पोलिसांनी नायलॉनच्या मांजावर (Sharp Kite String) बंदी घातली आहे. मात्र अजूनही लोक अशा मांजाचा वापर करत आहे, ज्यामुळे अजूनही अनेक अपघात घडत आहेत. नुकतेच मुंबई पोलिस अधिकारी याला बळी पडला आहे. वृत्तानुसार, पतंगाच्या मांजामुळे झालेल्या अपघातात मुंबई पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा गळा पतंगाच्या मांजाने कापला होता. मोटरसायकलवरून दक्षिण मुंबईकडे कोर्टामध्ये जात असताना हा अपघात घडला.

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, वरळी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश गवळी न्यायालयात जात असताना नायलॉनच्या मांजाने त्यांचा गळा कापला गेला. वेळेवर उपचार मिळाल्याने यांचा जीव वाचू शकला. मात्र या अपघातात पोलिस अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यांना 10 टाके पडले आहेत. गवळी हे 16 जानेवारी रोजी दुचाकीवरून जेजे उड्डाणपुलावरून जात असताना ही घटना घडली.

गवळी यांनी उड्डाणपुल पार केल्यानंतर पतंगाच्या मांजाने त्यांचा गळा कापला गेला. त्यांनी उड्डाण पुलावर दुचाकीचा कसा तरी समतोल साधला आणि स्वतःला खाली पडण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. उड्डाणपुलाजवळच तैनात असलेल्या दुसऱ्या पोलिसाने गवळी यांना रक्ताने माखलेले पाहिले व त्यांना तातडीने मुंबईतील सर जेजे रुग्णालयात दाखल केले, तेथून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. (हेही वाचा: सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे बर्ड फ्लू मुळे कोंबड्यांचा मृत्यू)

पोलिसांनी सांगितले की ही घटना मोठी असून अपघातामुळे अधिकारी त्यांचा आवाज कायमचा गमावू शकले असते. गवळी यांना काही दिवस न बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर कलम 308 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.