Maharashtra Police | (File Photo)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांसह त्याच्या बळींचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच कोरोनावर अद्याप ठोस औषध उपलब्ध नसून वैज्ञानिकांकडून त्याबाबत अधिक संशोधन करण्यात येत आहे. डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला कोरोनासारख्या महासंकटाच्या काळात पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणे वाढत आहेत. याच दरम्यान आता मुंबईतील पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे हेड कॉन्स्टेबल यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे.

हेड कॉन्स्टेबल गणेश चौधरी असे त्यांचे नाव असून त्यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटले आहे. यापूर्वी सुद्धा कोरोनामुळे पोलीस दलातील वीरांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 10 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे 55 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील पोलीस कर्मचारी सध्या कोरोनाच्या परिस्थितीत काम करणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे.(महाराष्ट्र पोलिसांवरील हल्ले रोखण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमत्र्यांना सुचवला 'हा' जालीम उपाय)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 39297 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 27589 जणांवर उपचार सुरु असून 1390 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्यात कोरोनाचा वेग कमी झाला असून साखळी अद्याप तुटलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.