No Water Supply in Parts Of Mumbai Update: 11, 12 सप्टेंबरला  जलवाहिनी बदलाच्या कामामुळे परळ, शिवडी, नायगांव भागात पाणीपुरवठा राहणार बंद
water tap | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

मुंबई मध्ये मुंबई महानगर पालिकेने  (Brihanmumbai Municipal Corporation) 100 वर्ष जुनी पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीचं काम हातामध्ये घेतले आहे. टप्याटप्प्याने केल्या जाणार्‍या या कामामध्ये एफ साऊथ (F South Ward) आणि ई वॉर्ड (E ward)  मध्ये अंतिम टप्प्यात 4 किमी लांब जलवाहिनी बदलली जाईल. मात्र यामुळे 11 आणि 12 सप्टेंबर दिवशी परळ (Parel), शिवडी(Sewri) , नायगाव (Naigao)  मध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दादर(Dadar) , हिंदमाता (Hindmata) आणि लालबाग (Lalbaug) भागामध्ये पाणी पुरवठा कमी दाबा ने होईल. या भागात केईएम, वाडिया, टाटा यासारखी महत्त्वाची हॉस्पिटल देखील येतात, त्यांचा पाणीपुरवठा देखील बंद राहणार आहे.

दरम्यान बीएमसी 1450 मीमी व्यासाची पाईपलाईन काढून 1500 मीमी व्यासाची नवी पाईपलाईन जोडणार आहे. हे काम झकारिया बंडर रोड वर होणार आहे. यासोबतच 600 मीमी व्यासाची पाईप शिवडी बस डेपो भागात जोडली जाणार आहे. यामुळे एफ दक्षिण विभागात पाणी पुरवठा सुधारण्यासाठी मदत होणार आहे.

शुक्रवारी, 11 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता काम सुरू होईल आणि पुढील 24 तास ते सुरू राहील. यामध्ये परळ, शिवडी, नायगांव, घोडपदेव आदी परिसरातील काही भागांतील पाणीपुरवठा बंद राहील. तर शनिवार 12 सप्टेंबरला शिवडी किल्ला, कोळीवाडा, टीजे रोड, झकारिया बंडर रोड,राणीची बाग, अभ्युदय नगर, भोईवाडा,घोडपदेव या भागातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

दरम्यान यंदा मुंबईच्या पाणी पुरवठा करणार्‍या तलाव, धरणांमध्ये चांगला पाऊस झाल्याने पाणी कपातीचे संकट यंदा नाही. वर्षभर पुरेल इतका साठा यंदा मुंबईच्या तलावांमध्ये आहे. हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आहे. यंदा जुलै महिन्यात 20% पाणी कपात जाहीर करण्यात आली होती. मात्र जसा पाऊस वाढला तशी टप्प्याटप्प्याने ही पाणी कपात कमी करण्यात आली आहे. सध्या मुंबईत पाणीकपात नाही. मात्र बीएमसीने जलवाहिनी दुरूस्त करण्याचं काम हाती घेतल्याने  यंदाच्या विकेंडला काही अंशी मुंबईतील नागरिकांना पाणीकपात सोसावी लागणार आहे.