Mumbai News: मुंबईतील चारकोप (Charkop) परिसरातून आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी कलम 34 (सामान्य हेतू), 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे), 465 (बनावट), 468 (फसवणूक करण्याच्या हेतूने खोटी) आणि 471 (खोटे कागदपत्रे खरा म्हणून वापरणे) अंतर्गत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 23 सप्टेंबर रोजी आयपीसी कायदा अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी चारकोप पोलिसांना माहिती मिळाली की एका व्यक्तीकडे बनावट आधार कार्ड आहे. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. तपासात त्याने एका टोळीकडून बनावट आधार कार्ड घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नीळकंठ नगर, चारकोप, कांदिवली पूर्व येथील एसआरए इमारतीत छापा टाकला. जिथे टोळी आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवण्यासाठी बनावट कागदपत्रे पुरवण्याचे केंद्र चालवत होती. तपासादरम्यान हे केंद्र शिव गुप्ता चालवत असल्याचे समोर आले. तपासणीत पोलिसांना बनावट जन्मतारखेचे दाखले, बनावट पॅनकार्ड, विविध कंपन्यांच्या बनावट विमा पॉलिसी आणि मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र सापडले.
पोलिसांनी एक मॉनिटर, एक कलर प्रिंटर, एक फिंगरप्रिंट स्कॅनर, एक लॅपटॉप, एक कॅमेरा, एक जीपीएस डिव्हाइस, एक आय स्कॅन मशीन, एक यूएसबी हब मशीन आणि बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिसांनी मारुफ खान (23) आणि दानिश शेख (23) या दोघांना कांदिवली पूर्व येथून अटक केली. दोघांवर गुन्हा दाखल केला.