माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार (Photo Credit : ANI)

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर ईडीने (ED) गुन्हा दाखल केला आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेचच हा गुन्हा दाखल झाला यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर आज (27 सप्टेंबर) रोजी दुपारी 2 वाजता शरद पवार ईडीच्या कार्यालयात दाखल होणार होते. मात्र ईडीने त्यांना मेल पाठवून तुम्हाला इकडे येण्याची गरज नसल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात काही ठिकाणी हिंसाचार उफाळला होता, तसेच मुंबईमध्येही कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरु केली होती. या सर्वांचाच विचार करून राज्यातील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयाला भेट न देण्याचा निर्णय घेतला आहे.

एएनआय ट्विट -

याबाबत नुकतेच शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ’24 सप्टेंबर रोजी आपण एका पत्रकार परिषदेत ईडीच्या कार्यालयाला भेट देणार असल्याचे सांगितले होते. ज्या बँकेशी माझा संबंध नाही त्या बँकेच्या घोटाळयामध्ये माझे नाव गोवले गेले, याबाबत ईडीला मी संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. मात्र निवडणुका येऊ घातल्या आहेत, माझे दौरे सुरु होतील या पार्श्वभूमीवर ही चौकशी पुढे ढकलण्यात यावे याबाबत मी विनंती केली होती. त्यावर ईडीने मेल पाठवून आता तुम्हाला इथे येण्याची गरज नाही. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा पूर्वसूचना देऊन आम्ही तुम्हाला बोलावू असे सांगितले. तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांच्या विनंतीवरून राज्यातील सेवा, शांतता व सुव्यवस्था बिघडू नये नये म्हणून मी ईडीच्या कार्यालयात जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे,’

या दरम्यान त्यांनी या संपूर्ण प्रकारणामध्ये त्यांना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ देणारे नेते, राहुल गांधी, मनमोहन सिंह, शिवसेना व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर आता शरद पवार पुणे आणि बारामतीचा दौरा करणार आहेत. यावेळी ते पूरग्रस्तांना भेट देऊन परस्ठीतीचा आढावा घेतील. आता पुढे निवडणूक, प्रचार आणि जास्तीत जास्त जागा निवडणून आणणे यावर शरद पवार आणि राष्ट्रावादी कॉंग्रेसचे लक्ष असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. (हेही वाचा: Maharashtra Co-operative Bank Scam: शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद)

शरद पवार ट्विट -

दरम्यान, सन 1961 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (Maharashtra State CO Bank) तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, यामध्ये अनेक बड्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. अजित पवार या बँकेच्या संचालक पदी होते. अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे सोबतच इतर तब्बल 50 अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शरद पवार यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.