
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी 701 किमी लांबीचा सहा-लेन प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे. हा महामार्ग मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडतो, ज्यामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे 16 तासांवरून 8 तासांपर्यंत कमी होईल. आता मुंबई ते नागपूर या समृद्धी एक्सप्रेसवेचा शेवटचा इगतपुरी ते आमणे दरम्यानचा 76 किमीचा मार्ग या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे भिवंडीहून लवकरच मोटारचालकांना मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेसवेवरून प्रवास करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या एक्सप्रेसवेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, सध्या अंतिम लेन मार्किंग आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. हे काम 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्व प्रमुख बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच ही कामे केली जातात, ज्यामुळे महामार्ग सार्वजनिक वापरासाठी जवळजवळ तयार असल्याचे दिसून येते. उद्घाटन कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल, असे हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
सध्या, नाशिकजवळील इगतपुरी ते नागपूर हा 625 किमी लांबीचा एक्सप्रेस वे कार्यरत आहे. नव्या सरकार स्थापनेत आणि खात्यांच्या वाटपात झालेल्या विलंबामुळे नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये हा 76 किमी लांबीचा इगतपुरी-अमाणे मार्ग खुला करण्याची योजना पुढे ढकलण्यात आली. त्याऐवजी, एमएसआरडीसीने सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा आणि संपूर्ण मार्ग एकाच वेळी सुरू करण्याचा निर्णय घेतला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 701 किमी लांबीचा एक्सप्रेसवे, डिसेंबर 2022 पासून टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या 520 किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन केले. मे 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भरवीर या 105 किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन केले. भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा आणखी एक 25 किमी लांबीचा मार्ग मार्च 2024 मध्ये कोणत्याही औपचारिक कार्यक्रमाशिवाय वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला. आता शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होऊ घातले आहे. मुंबई-नाशिक महामार्ग आणि समृद्धी एक्सप्रेसवे दरम्यान वाहतूक सुलभ करण्यासाठी, तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. (हेही वाचा: FASTag Mandatory: महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून टोलवर फास्टॅग अनिवार्य; सरकारने जारी केले निर्देश, अन्यथा आकाराला जाणार दुप्पद दंड)
दरम्यान, एक्सप्रेसवेकडे गेम चेंजिंग पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून पाहिले जात असले तरी, रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांच्या अभावाबद्दल वाहनचालकांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, एमएसआरडीसी एक्सप्रेसवेवर दहा सार्वजनिक उपयोगिता क्षेत्रे विकसित करत आहे, ज्यामध्ये पेट्रोल पंप, भोजनालये आणि विश्रांती थांबे यांचा समावेश असेल. १५० किमी प्रतितास वेगाला समर्थन देण्यासाठी बांधलेल्या या एक्सप्रेसवेमध्ये वन्यजीव अंडरपास, उड्डाणपूल आणि पादचारी क्रॉसिंगसारख्या आधुनिक पायाभूत सुविधा आहेत, ज्यामुळे प्रवाशांसाठी कार्यक्षमता आणि सुरक्षितता यांच्यात संतुलन राखले जाते. भिवंडीपर्यंतच्या विस्तारामुळे, एक्सप्रेस वेमुळे मुंबई आणि नागपूरमधील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि विद्यमान महामार्गांवरील गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. अंतिम टप्प्याचे काम पूर्ण होत आहे आणि एकदा हा मार्ग उद्घाटन झाल्यानंतर, प्रवाशांना मुंबईहूनच एक सुरळीत आणि जलद मार्ग मिळेल.