Samruddhi Mahamarg

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway Accident: मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावर (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) अमरावतीमधील तळेगाव-दशासरजवळ एक मोठा अपघात झाला आहे. या ठिकाणी कंटेनर ट्रकला टूरिस्ट ट्रॅव्हल्स बसने धडक दिल्याने तीन प्रवासी ठार झाले असून, 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. साधारण 30 हून अधिक प्रवासी असलेली ही बस समृद्धी कॉरिडॉरवरून भरधाव वेगाने जात असताना पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अचानक समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकवर आदळली आणि नंतर रस्ता दुभाजकावर आदळली. ही बस महाराष्ट्रातील अहमदनगरहून छत्तीसगडची राजधानी रायपूरला जात होती.

या अपघातातील जखमी लोकांना तळेगाव-दशासर आणि अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बस चालकाच्या डोळ्यावर झोप असल्याने त्याचे नियंत्रण सुटले असावे आणि ही दुर्घटना घडली असावी.

या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अद्याप त्याची ओळख पातळी नाही. अपघातानंतर ताबडतोब पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बसमध्ये अडकलेल्या इतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले, मृतांचे मृतदेह ओळखून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. याबाबत नागपूर स्थित कौन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राइट्स (सीपीआर) चे अध्यक्ष बॅरिस्टर विनोद तिवारी म्हणाले की, समृद्धी महामार्गावरील अपघाती मृत्यूंच्या मालिकेनंत त्यांची एनजीओ आणि इतर अनेकांनी समृद्धी एक्सप्रेसवेवर योग्य अंतराने विविध सुविधांसाठी वारंवार आवाहन केले आहे. (हेही वाचा: Samruddhi Expressway: समृद्धी द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल; दर 5 किलोमीटरवर बसवल्या जाणार Rumble Strips)

दरम्यान, व्हीएनआयटीच्या वाहतूक अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की, समृद्धी महामार्गावर पुरेसे थांबे नाहीत, त्यामुळे सतत ब्रेकशिवाय वाहन चालवल्याने ड्रायव्हर्समध्ये 'हायवे संमोहन' विकसित होते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. तिवारी पुढे म्हणाले, याआधी 1 जुलै 2023 रोजी बुलढाणा येथे याच एक्स्प्रेस वेवर झालेल्या बस अपघातात 25 प्रवासी ठार झाल्याची मोठी शोकांतिका घडलेली असूनही, अधिकार्‍यांनी त्यातून कोणताही धडा घेतला नाही किंवा प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. या महामार्ग अजूनही मृत्यूचा सापळा आहे.