BMC: कोरोनाच्या भीतीने दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेचे नोटीस; 72 तासांच्या आत कामावर हजर न राहिल्यास जाणार नोकरी
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी पोलीस कर्मचारी आपल्या जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतू, मुंबई महानगरपालिकेतील (Mumbai Municipal Corporation) वर्ग-3 आणि वर्ग-4 चे काही कर्मचारी कोरोनोच्या भितीने वारंवार अनुपस्थित राहत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अशा कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस पाठवले आहे. महत्वाचे म्हणजे, येत्या 72 तासात कामावर हजर न राहिल्यास त्यांना बडतर्फ केले जाणार आहे. तसेच त्यांच्या जागी तातडीने कंत्राटी स्वरूपात नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहे.

महापालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल यांच्‍या प्रमुख मार्गदर्शनात व्हिडिओ कॉन्‍फरन्सिंगद्वारे एका विशेष बैठकीचे आयोजन आज करण्‍यात आले होते. या बैठकीत रुग्‍णालयातील मनुष्‍यबळ व्‍यवस्‍थापनाबाबत सविस्‍तर चर्चा झाली. सध्‍या रुग्‍णालयातील अनेक कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहत आहेत. यामुळे रुग्‍णालयात कर्तव्‍यावर उपस्थित राहत असलेल्‍या डॉक्‍टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी यांच्‍यावर कामाचा अतिरिक्‍त ताण येत आहे. परिणामी रुग्‍णालयाचे सुयोग्‍य व परिपूर्ण व्‍यवस्‍थापन करणे दिवसेंदिवस कठीण होण्‍यासह वैद्यकीय सेवा-सुविधांवर प्रतिकूल परिणाम होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. या दोन्‍ही बाबी लक्षात घेता अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्‍काळ कामावर हजर होणे गरजेचे व आवश्‍यक आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Mumbai Update: मुंबईत एकूण 44 हजार 704 जणांना कोरोनाची लागण; गेल्या 24 तासात 1 हजार 442 नव्या रुग्णांची नोंद तर, 48 मृत्यू

उपरोक्‍त तपशीलानुसार 72 तासांची नोटीस देऊन देखील जे कर्मचारी हजर होणार नाहीत, त्‍यांना तात्‍काळ बडतर्फ करण्‍याचे व त्‍यांच्‍या जागी कंत्राटी तत्‍वावर नवीन कर्मचा-यांची नियुक्‍ती करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत. तसेच मंजूर पदांपैकी जी पदे रिक्‍त आहेत, ती पदेदेखील कंत्राटी तत्‍वावर भरण्‍याचे निर्देशही चहल यांनी दिले आहेत. यानुसार बडतर्फीमुळे रिक्‍त झालेल्‍या आणि आधीपासून रिक्‍त असलेल्‍या पदांवर कंत्राटी पद्धतीने मनुष्‍यबळ उपलब्‍ध करुन घेण्‍यासाठी सेवा पुरवठादार संस्‍थांची नियुक्‍ती करण्‍याचे निर्देश देखील महापालिका आयुक्‍तांनी आजच्‍या बैठकीदरम्‍यान दिले आहेत.