Mumbai Metro Line 3 Trial: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाइन-3 पुढील आठवड्यात ट्रायलसाठी सज्ज; मे अखेरपर्यंत सुरु होऊ शकतो पहिला टप्पा
Mumbai metro

Mumbai Metro Line 3 Trial: बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3 कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर याबाबत मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याची अंतिम चाचणी सुरू झाली आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत मेट्रो-3 चा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो-3 आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पर्यंत सुरू होईल. मेट्रो 3 हा कुलाबा-वांद्रे-सिप्झ असा 33.5 किमी लांबीचा भूमिगत कॉरिडॉर आहे.

यापूर्वी मेट्रोच्या वेगाचे मूल्यांकन करण्यासाठी रिकाम्या डब्यांसह ड्राय रन घेण्यात आली होती. रिकाम्या डब्यांच्या यशस्वी चाचणीनंतर आता आठ डब्यांच्या मेट्रो ट्रेनच्या प्रत्येक डब्यात बारीक खडी भरलेल्या पिशव्या ठेऊन त्यांची चाचणी होणार आहे. या ‘लोडेड ट्रायल’चा उद्देश प्रवाशांचा भार हाताळण्यात या गाड्या किती चांगली कामगिरी करतात याची खात्री करणे हा आहे.

पुढील आठवड्यात ही ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो-3 च्या या चाचण्या सरळ आणि वक्र मार्गांवर घेण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी ही सेवा सुरू करण्यापूर्वी मेट्रो प्रशासन कोणतीही अनियमितता होणार नाही याची खबरदारी घेत आहे. मुंबई मेट्रो-3 प्रकल्प 96 टक्के पूर्ण झाला आहे. उर्वरित काम हे स्टेशन सुशोभीकरण आणि इतर किरकोळ कामे आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मते, भूमिगत मेट्रो सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे 260 सेवा सुरू होतील. त्यामुळे सुमारे 17 लाख प्रवासी यातून प्रवास करणार आहेत. (हेही वाचा: Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे 25 एप्रिलला शहरातील 'या' भागात करण्यात येणार पाणीकपात)

मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही सुरू आहे. दुसरा टप्पा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी असा असेल. पहिल्या टप्प्याचा एकूण खर्च 37,000 कोटी रुपयांपर्यंत आहे. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी कफ परेडमध्ये जोडण्यात येणार आहे. या ऑक्टोबरच्या अखेरीस दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाची एकूण लांबी 33 किमी असून, त्यावर एकूण 27 स्थानके आहेत. पहिला टप्पा आरे ते बीकेसी दरम्यानचा आहे. या टप्प्यात 10 स्थानके असतील.