
मुंबई मेट्रो 3 (अॅक्वा लाईन) चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात बीकेसी आणि आचार्य अत्रे चौक दरम्यान लवकरच मेट्रो सेवा सुरू होणार आहे. यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर केली जाईल. कारण मेट्रो-3 कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचे सुरक्षा निरीक्षण सोमवारपासून मेट्रो रेल सेफ्टी कमिशनर यांच्या पथकाने सुरू केले आहे. सीएमआरएस चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणि अंतिम अहवाल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे सादर केल्यानंतर, या मार्गावरील सेवा सुरू होईल. याआधी 7 ऑक्टोबर 2024 रोजी अंशतः सुरू झाल्यापासून, अॅक्वा लाईन आरे जेव्हीएलआर आणि बीकेसी दरम्यान कार्यरत आहे.
बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे, विशेषतः बीकेसी आणि आचार्य अत्रे चौक दरम्यान राहणाऱ्या लोकांसाठी, प्रवास करणे खूप सोपे होईल. हा विभाग मुंबईतील पहिला पूर्णपणे भूमिगत मेट्रो ट्रेन सेवा असेल, ज्यामध्ये धारावी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक अशी एकूण 6 स्थानके असतील. आचार्य अत्रे चौकानंतर, जुलै महिन्यापर्यंत कफ परेडला जाणारी मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. बीकेसी आणि आचार्य अत्रे चौकातील अंतर सुमारे 9.6 किमी आहे.
एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात, मेट्रो-3 कॉरिडॉरचा हा भात सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर, मेट्रो 3 कॉरिडॉरच्या एकूण 33.35 किमी मार्गापैकी 20 किमी मार्गावर प्रवाशांना मेट्रो सेवा उपलब्ध होईल. मेट्रो-3 कॉरिडॉरच्या बीकेसी आणि आचार्य अत्रे चौक दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून मेट्रोची चाचणी सुरू होती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केलेल्या तपासणीत, मेट्रोच्या 9.6 किमी मार्गावर बसवलेली सर्व उपकरणे योग्यरित्या कार्यरत असल्याचे आढळून आले. यानंतर, एमएमआरसीएलने सीएमआरएस टीमला अंतिम तपासणीसाठी आमंत्रित केले. (हेही वाचा: Mumbai Coastal Road Phase 2: मुंबईच्या कोस्टल रोड फेज 2 मधील वर्सोवा-भाईंदर लिंक रोडसाठी 104 हेक्टर वनजमीन वापरली जाणार; 21 एप्रिलपर्यंत नोंदवू शकता हरकती)
मेट्रो सुरू करण्यापूर्वी सीएमआरएसकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. सीएमआरएस तपासणीमध्ये ट्रॅक, ओव्हरहेड सिस्टीम, अग्निसुरक्षा, वायुवीजन यंत्रणा, आपत्कालीन निर्गमन मार्ग, स्टेशनवर उपलब्ध असलेल्या प्रवाशांच्या सुविधा इत्यादींची तपासणी केली जाते. यासाठी, सीएमआरएसचे वेगवेगळे पथक मेट्रो मार्गावर बसवलेल्या सर्व उपकरणांची तपासणी करतात. दरम्यान, मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी (आरे-बीकेसी) किमान भाडे 10 रुपये आणि कमाल भाडे 40 रुपये निश्चित करण्यात आले आहे. आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या विस्तारित विभागात, वरळी आणि सिद्धिविनायकपर्यंत जास्तीत जास्त भाडे 60 रुपये असेल.