Mumbai Metro | (Photo Credits: twitter)

मुंबई शहरातील बहुचर्चित मेट्रो (Mumbai Metro) प्रवासाचा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत या टप्प्याच्या चाचणीस आजपासून (सोमवार, 31 मे) सुरुवात झाली. डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान ही चाचणी पार पडले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) ही चाचणी करत आहे. मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमडळातील प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो चाचणीस हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमासाठी आकुर्ली स्थानकात विशेष आयोजन करण्यात आले होते.

मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासाच्या चाचणीस आजपासून सुरुवात झाली. याच वेळी एमएमआरडीएकडून मेट्रोच्या भुयारी आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. हा भुयारी मार्ग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) च्या टर्मिनल 1 (टी 1) आणि टर्मिनल 2 (टी 2) ला पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला आहे. (हेही वाचा, Metro Line 2A आणि Metro Line 7 चाचणीसाठी सज्ज, 'या' दिवशी प्रवाशांच्या सेवेत होणार हजर)

कशा असतील चाचण्या?

    • पुढील चार महिन्यांत डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान चाचणी प्रक्रिया पार पडेल.
    • या चाचण्या 20 किमी मार्गावर सुरु होतील.
    • मेट्रो 2 अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर) आणि मेट्रो 7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या मार्गावरील दोन टप्प्यात धावणार मेट्रो.
    • पहिला टप्पा प्रवाशांसाठी ऑक्टोबर महिन्यात खुला होईल.
    • दुसरा टप्पा जानेवारी 2022 पर्यंत सुरु होणे अपेक्षीत.

दरम्यान, राज्यात सध्या कोरोना महामारीचा काळ असल्याने कडक निर्बंध घालावे लागत आहे. बरीचशी बंधणं असतानाही मेट्रोची कामं वेळेत पूर्ण करण्यात आली. त्यामुळेच पूर्व नियोजीत कार्यक्रमानुसार ही चाचणी वेळेत पार पडू शकत असल्याचे एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.