मुंबईतील (Mumbai) रफी अहमद किडवई मार्गावर एका मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाची मुलगी असलेल्या या पीडितेवर मुंबईतील शिवडी भागातील त्यांच्या ड्रायव्हरने बलात्कार केला आहे. महत्वाचे म्हणजे हा चालक या मुलीवर तब्बल 8 वर्षे बलात्कार करत होता.
ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा अल्पवयीन मुलीने तिच्या शाळेतील शिक्षिकेला याची माहिती दिली. त्यानंतर या शिक्षिकेने घडला प्रकार मुलीच्या कुटुंबाला सांगितला. नंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
मुलीच्या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे. आपल्या जबानीत मुलीने पोलिसांना सांगितले की, ती घरी एकटी असताना आरोपी तिला अश्लील व्हिडिओ दाखवायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. तिने याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा तिने केला. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी वारंवार धमकी हा ड्रायव्हर मुलीला देत होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपीला मुंबईतील अँटॉप हिल भागातील त्याच्या घरातून अटक केली. याबाबत पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याआधी मुंबईतील घाटकोपर उपनगरात राहणाऱ्या एका मानसिकदृष्ट्या अस्थिर मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडिता बाथरूममध्ये गेली होती तेव्हा तिन्ही आरोपींनी तिला घेरले. (हेही वाचा: शिक्षिकेने केला 16 वर्षांच्या विद्यार्थ्यावर बलात्कार; दाखवले चांगल्या मार्कांचे आमिष)
एका मुलाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याचा आरोप आहे तर दुसऱ्या आरोपीने त्याच्या मोबाईलने याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडितेच्या भावाने नातेवाईकांना बहिणीसोबत झालेल्या गैरवर्तनाची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक केली.