
ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान (Thane -Diva Railway Station) 5 व्या,6व्या लाईनवर काम करण्यासाठी मध्य रेल्वेकडून या विकेंडलाही मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) दिलेल्या माहितीनुसार हा 72 तासांचा मेगा ब्लॉक आहे. 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान हा ब्लॉक घेतला जाणार असून यामुळे मुंबई लोकल सोबतच कोकणात जाणार्या एक्सप्रेस ट्रेन , मेल गाड्या देखील रद्द होणार आहेत.
मध्य रेल्वे कडून 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं मोठं काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक विकेंडला जम्बो ब्लॉक घेतले जातात अजून 2 ब्लॉक नंतर हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर प्रवाशांसाठी दोन्ही मार्गिका कार्यान्वित केल्या जाणार आहेत.
दरम्यान कोकणात जाणार्या तेजस, जनशताब्दी, एसी डबल डेकर, कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत. दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व फास्ट (जलद लोकल) लोकल गाड्या स्लो (धिम्या मार्गावर) ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत.
मागील महिन्यात 22, 23 जानेवारीला देखील 14 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे या विकेंडला बाहेर पडणार असाल तर रेल्वेचं हे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा आणि रेल्वे प्रवासाचे प्लॅन्स बनवा.