नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन टँकर गळती दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा नाहक बळी गेल्याने या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्यानुसार, यापुढे मुंबईत ऑक्सिजन प्लांटमध्ये जाण्याची कुणासही परवानगी नसणार असे सांगण्यात आले आहेत.
"मुंबईत ऑक्सिजन प्लांटमध्ये जाण्याची परवानगी कोणालाही देऊ नका" असा आदेश रुग्णालयांना देण्यात आला असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. 10 मीटर दूरपर्यंत जाळ्या लावा. तसंच तिथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक करा, एकदा जाऊन सर्व सुरळीत आहे की नाही याची काळजी घ्या असं सांगितलं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.हेदेखील वाचा- डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत निष्काळजीपणा केल्याचे पोलीस रिपोर्ट्समधून स्पष्ट, अज्ञात व्यक्तिच्या विरोधात गुन्हा दाखल
नाशिकमधील दुर्घटना ही खूपच दुर्दैवी आणि सर्वांसाठी धक्कादायक होती. याच पार्श्वभूमीवर "आपण मुंबईतील सर्व कोविड सेंटरचे ऑडिट करणार आहोत. खासगी रुग्णालयात असणाऱ्या बेड्सच तसंच येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं रुग्णालयाचं ऑडिट होत आहे. ऑडिट आणि सुरक्षा एकत्र सुरु आहे." असही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणाचा तपास होणार असून, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सात जणांचा उच्चस्तरीय समितीत समावेश असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच, या घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, ही दुर्घटना घडली त्या वेळी रुग्णालयात सुमारे 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यापैकी 22 जणांचा मृत्यू झाला.