मुंबई: महापौर-उपमहापौर निवडणुकांना 3 महिन्यांची मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Mantralay (Photo Credits : Facebook)

आगामी विधानसभा निवडणुक (Vidhan Sabha Election) पाहता महापौर (Mayor)-उपमहापौर (deputy Mayor) निवडणुकांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवारी (13 ऑगस्ट) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता महापालिकांच्या महापौरांना मुदतवाढ मिळणार असून त्यांचा कार्यकाळ आता 8 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईसह राज्यातील सर्व महापौरांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असून तो 8 सप्टेंबर रोजी पूर्ण होणार होता.

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी बैठकीदरम्यान काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीवेळी सातारा, सांगली, कोल्हापूरसह अन्य राज्यांना 6813 कोटींची मदत जाहीर करण्यात आल्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.(Maharashtra Floods 2019: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह कॅबिनेट मंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी दान केला महिन्याभराचा पगार; राज्याकडून 6813 कोटींची मदत जाहीर)

तसेच राज्यशासनाच्या विविध विभागांमार्फच राबवण्यात येणाऱ्या कौशल्य आणि उद्योजकता विकासासह क्षमता वृद्धिंगत करण्यासंबंधित प्रकल्प महाराष्ट्रात लवकरच राबवण्यात येणार आहेत. त्याचसोबत विधानसभेची आगामी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत तीन महिन्यांची मुदतवाढ महापौर-उपमहापौरांना देण्यात आली आहे. नागपूर येथील महाराष्ट्र राज्य हातमाग मंडळाच्या सेवानिवृत्त 300 हून अधिक कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशा विविध गोष्टींबद्दल आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत.