लोकल रेल्वेचे तिकिट दर वाढण्याचे संकेत, मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार 6 वातानुकूलित लोकल रेल्वे
Mumbai Local (Photo Credit : PTI)

अलीकडेच मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल रेल्वेचे (Mumbai AC Railway) तिकिट दर वाढल्याची घोषणा करण्यात आली. ही बातमी कानावर येते नं येते तोच आता लोकल रेल्वेच्या (Local Railway) तिकिटचे दरही वाढवणार असल्याचे संकेत रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे. मात्र याबाबत अजून तरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुंबई उपनगरीय रेल्वेचे तिकिट दर हे देशातील अन्य रेल्वेच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहेत. त्यामुळे मुंबईकरांना या किंमतीत रेल्वेच्या सुविधा देणे शक्य नाही म्हणून आगामी काळात मुंबई लोकलचे तिकिट दर वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

रेल्वे मंडळाचे रोलिंग स्टॉक सदस्य राजेश अग्रवाल दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते.त्यावेळी त्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल कारशेडची पाहणी केली. तसेच रेल्वे मंडळाकडून मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी एकूण १२ वातानुकूलित लोकल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी ६ वातानुकूलित लोकल मिळणार आहेत. या १२ लोकल मार्च २०२० पर्यंत मुंबई रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

मुंबई उपनगरीय लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. देशातील कोणत्याही रेल्वेच्या तुलनेत मुंबई रेल्वेचे तिकीट सर्वात स्वस्त आहे. सीएसएमटी ते कल्याण स्थानकादरम्यान लोकल प्रवासासाठी केवळ १५ रुपये मोजावे लागतात. प्रवाशांना सुविधा हव्या असल्यास त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. मात्र हे अधिक पैसे राज्य सरकारने द्यायचे की प्रवाशांनी द्यायचे या महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे भविष्यात या तिकीट दरांमध्ये सुविधा पुरवणे कठीण असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

मुंबईतील वातानुकूलित लोकल रेल्वेचा प्रवास महागला, 1 जूनपासून होणार नवीन दरवाढ होणार लागू

काही दिवसांपूर्वी म्हणजेच 1 जून पासून वातानुकूलित लोकल रेल्वेच्या तिकिटदरात नवीन दरवाढ लागू झाली. ह्या नवीन दरवाढीनुसार तिकिट दरात 1.3 पटीने वाढ करण्यात आली आहे.