Mumbai Local Mega Block Update: मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर नाताळ दिवशी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर नाईट ब्लॉक
Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल (Mumbai Local) या रविवारी अर्थात 25 डिसेंबर दिवशी देखील मेगा ब्लॉक (Mega Block) मुळे काही काळ बंद राहणार आहे. काही यांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. ख्रिसमस/नाताळ चा सण असूनही मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे त्यामुळे सुट्टी एंजॉय करण्यासाठी बाहेर पडणार्‍यांनी हे वेळापत्रक पाहूनच दिवसभराचं प्लॅनिंग करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर ब्लॉक धीम्या मार्गावर असणार आहे.

मध्य रेल्वेचा रविवारी ब्लॉक असला तरीही पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल ते माहीम दरम्यान दोन्ही जलद मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे. रविवारी मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक असणार नाही.

रविवारी सीएसएमटी-विद्याविहार यांच्या दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक सकाळी 10.55 ते 3.55 या वेळेत असणार आहे. या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते घाटाकोपर दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल फास्ट ट्रॅकवर चालवल्या जातील. या दोन्ही स्थानकांमध्ये भायखळा, परेल, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला स्थानकामध्ये लोकलला थांबा दिला जाणार आहे. हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल-माहीम मार्गावर 24 डिसेंबरच्या रात्री 12 ते 25 डिसेंबरच्या पहाटे 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान आणि अंधेरी-सांताक्रूझदरम्यान लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर मात्र ‘मेगाब्लॉक’ नाही.