मुंबई मध्ये उद्या (30 जुलै) दिवशी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महिन्यातल्या या शेवटच्या रविवारी विकेंड एन्जॉय करायला बाहेर पडत असाल तर मेगाब्लॉकचं वेळापत्रक पाहून तुमच्या रेल्वे प्रवाशाचं प्लॅनिंग करा. मुंबई लोकलच्या दुरूस्ती आणि देखभालींच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. सध्या पावसाचे दिवस असल्याने आठवडाभर मुंबईकरांसाठी रेल्वेची सेवा सुरळीत ठेवण्यासाठी हा ब्लॉक आवश्यक असतो.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैला मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर ठाणे – कल्याणदरम्यान पाचवी आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर पनवेल –वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. पश्चिम मार्गावर मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर ठाणे – कल्याणदरम्यान पाचवी आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत ब्लॉक असणार आहे. यावेळेत सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीवरून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाडय़ा 10-15 मिनिटे उशिराने धावतील. तर सकाळी 9.50 ची वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. ही मेमू कोपर – दिव्यादरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच ही मेमू दिव्या ऐवजी सकाळी 11.45 वाजता कोपर ते वसई रोडदरम्यान धावणार आहे.

हार्बर लाईन ब्लॉक

हार्बर लाईन वर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11 ते सुपारी 4 दरम्यान असेल. यामध्ये पनवेल-सीएसएमटी आणि सीएसएमटी - पनवेल/बेलापूर ही लोकल सेवा रद्द केली जाईल.

पश्चिम रेल्वे मार्ग

पश्चिम रेल्वे मार्गावर मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक फास्ट लाईन वर वळवलेली असेल.