Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

मुंबई मध्ये लाईफलाईन अर्थात मुंबई लोकलच्या (Mumbai Local) दुरूस्तीच्या, देखभालीच्या कामासाठी घेतला जाणारा मेगाब्लॉक (Megablock) या रविवारी देखील असणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी दिवशी पश्चिम रेल्वे मार्ग आणि हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक नसल्याने तेथील प्रवासी सुस्साट प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे मुंबईत उद्या ट्रेनने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हा ब्लॉकचा कालावधी तुमच्या प्लॅनिंगमध्ये येणार नाही याची काळजी घ्या.

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या वेळेत रेल्वेसेवा बंद राहणार आहे.पनवेल आणि कुर्ला दरम्यान या ब्लॉकमध्ये विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना 22 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवासाची मुभा असणार आहे.

दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर देखील ब्लॉक असणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद गाड्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत.

अंधेरी येथील गोखले ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर 21 आणि 22 जानेवारीच्या रात्री ब्लॉक असणार आहे. साडेहार तासांच्या ब्लॉकमध्ये पश्चिम रेल्वेवरील काही लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. रात्री 00.15 ते 4.45 पर्यंत असणार आहे.