Mumbai Local Mega Block: मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; पहा वेळा
Mumbai Local | ( Photo Credits: Pixabay.com)

आज 2 एप्रिल दिवशी मुंबईकरांना तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) असल्याने सांभाळून प्रवासाचं नियोजन करावं लागणार आहे. अनेक जण सध्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना घेऊन फिरण्याचा प्लॅन करत असतील तर जरा थांबा आणि ट्रेनच्या प्रवासासाठी या वेळा बघूनच बाहेर पडा. दुरूस्तीच्या कामासाठी घेण्यात येणार्‍या आजच्या मेगाब्लॉकमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ठाणे- कल्याण आणि पनवेल-वाशी दरम्यानची सेवा देखील ठप्प असणार आहे. सकाळी 11 ते 4 या वेळेत तिन्ही मार्गावरील लोकल सेवा प्रभावित असणार आहे.

सीएसएमटी मधून सुटणार्‍या सकाळी 9.30 ते 2.45 दरम्यानच्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत. तर यांना कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांत देखील थांबा असणार आहे. त्यामुळे निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं त्या उशिरा धावणार आहेत.

कल्याण स्थानकातून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप फास्ट गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालवल्या जातील.

पनवेल स्थानकातून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी ममुंहाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा ठप्प राहणार आहे.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील बंद असेल.

मेगाब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 10.30 ते 3.35 दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सर्व गाड्या जलद धीम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत.