Mumbai Kamala Building Fire Update: ताडदेवच्या 'कमला इमारती' मधील आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 7 वर!
मुंबई आग । PC: Twitter/ANI

मुंबई मध्ये आज (22 जानेवारी) सकाळी 7.30 च्या सुमारास ताडदेव भागातील 'कमला रहिवासी'(Kamala Building) इमारतीमध्ये आगीचा भडका उडाला आहे. भाटिया हॉस्पिटल (Bhatia Hospital) जवळ असलेल्या या 20 मजली इमारतीच्या 18व्या मजल्यावर आग लागली होती. सध्या या आगीचे लोळ आटोक्यात आले आहेत मात्र धूर प्रचंड असल्याची माहिती तेथे भेट द्यायला गेलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. दुर्दैवाने या घटनेमध्ये 7 जण मृत्यूमुखी पडले आहेत.

हेमंत परब, CFO, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 28 जण जखमी आहेत. त्यांना विविध रूग्णालयात दाखल केले आहे.आग लागण्याचं कारण शोधलं जात आहे. इमारतीमध्ये अग्निशमनची व्यवस्था आहे पण काही कारणास्तव ती कार्यान्वित होऊ शकली नाही. धुर इमारतीमध्ये कोंडल्याने अनेकांची प्रकृती बिघडली आहे.

मुंबई महापौर यांनी घटनास्थळाला भेट देत सहा वृद्ध नागरिकांना आगीच्या धूराचा त्रास झाल्याने ऑक्सिजन सपोर्टची गरज आहे त्यासाठी त्यांना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. जखमींना नायर हॉस्पिटल, भाटिया हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. महापौरांसोबतच भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात्त लोढ देखील हजर होते. मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या घटनेची दखल घेत कुलिंग ऑपरेशन, बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली आहे. नक्की वाचा: Mumbai Fire: मुंबईत ताडदेव परिसरात भाटिया हॉस्पिटल जवळील 20 मजली Kamala इमारतीमध्ये आग  .

ANI Tweet

DCP सौरभ त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचं वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 21 गाड्या दाखल झाल्या. त्यांच्या मदतीला ट्राफिक पोलिस आणि स्थानिक पोलिसांची देखील मदत घेतली जात आहे. प्राथमिक अंदाजा नुसार, 15व्या मजल्यावर आग लागली आणि वर वर पोहचली. 19 वा मजला सर्वाधिक प्रभावित झाला आहे. 15 जखमींना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते त्यावेळी 4 जणांची प्रकृती गंभीर होती.