Image For Representation (फोटो सौजन्य-फेसबुक)

Mumbai: मुंबईत ड्रग्ज तस्करीचे नेटवर्क संपूर्ण ठिकाणी पसरलेले दिसत आहे. या जाळ्यात  विद्यार्थ्यांसह बेरोजगार तरुण, तरुणी अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण आणि  तरुणी नशेच्या आहारी जात असल्याचे पाहायला मिळत आहे.  या परिस्थितीवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई झोनल युनिटने मुंबईतील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने केलेल्या या कारवाईत  11.54 किलो उच्च प्रतीचे कोकेन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हायड्रोपोनिक तण, 5.5 किलो गांजाची गमी (200 पाकिटे) आणि 160,000 रुपये जप्त केले आहेत. हे ड्रग्ज सिंडिकेट परदेशातील एक गट चालवत असल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांपैकी काही प्रमाणात अमेरिकेतून मुंबईत आणून कुरिअर सेवेद्वारे भारत व इतर देशांमध्ये पाठवले जात होते. हेही वाचा: Navi Mumbai Shocker: नवी मुंबईतील पोद्दार शाळेत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरून उडी केली आत्महत्या

या प्रकरणातील काही जप्ती मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कुरिअर एजन्सीकडून झाली आहे, जी ऑस्ट्रेलियाला पार्सल पाठवणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "नशामुक्त भारत" संकल्पनेनुसार आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी 2025 मध्ये 200 ग्रॅम कोकेन जप्त करताना सापडलेल्या सुत्रांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या सूत्रांच्या आधारे एनसीबीच्या पथकाने सखोल तपास केला. परिणामी या पथकाने नवी मुंबईत ड्रग्ज आणि पैसे जप्त केले आहे. या कारवाईदरम्यान एनसीबीने या ड्रग्ज तस्करीत सहभागी असलेल्या 4 जणांना अटक केली आहे.

अटक केलेल्या संशयितांनी सांगितले कि, हे सिंडिकेट एक अत्यंत मोठे नेटवर्क म्हणून कार्यरत होते, जिथे व्यक्ती एकमेकांसाठी टोपणनावांचा वापर करतात आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या योजनांवर काम करतात.

एनसीबी आता ड्रग्ज सिंडिकेटच्या नेटवर्कचा अधिक सखोल तपास करत आहे आणि यामागे आणखी कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच ड्रग्जच्या बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजची ओळख पटवण्याचे काम केले जात आहे.

ही कारवाई भारतातील इतर भागांतील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठे यश असून एनसीबीच्या पथकाने अमली पदार्थ तस्करांवर सातत्याने कारवाई करण्यात येईल, असे कडक संकेत दिले आहेत.