Coronavirus: दोन बायका असलेल्या नवऱ्याच्या संपत्तीवर हक्क कोणाचा? वाचा Mumbai High Court Decision
Husband Wife And Court | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'दोन बायका आणि फजीती ऐका' ही म्हण मराठीत पूर्वंपार चालत आले. कधी कधी दोन बायकांच्या भांडणाचे प्रकरण थेट न्यायालयातही पोहोचते. अशाच एका प्रकरणात दोन बायका असलेल्या नवऱ्याच्या संपत्तीवर हक्क कोणाचा? याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका प्रकरणाच्या निकालात मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) म्हणते की, जर एखाद्या व्यक्तीच्या दोन पत्नी असतील आणि पतीच्या संपत्तीवर त्या दोघींनीही दावा केला असेल. तर, पतीच्या संपत्तीवर पहिल्या पत्नीचाच हक्क असेल. दोन्ही पत्नीच्या मुलांचा मात्र वडीलांच्या संपत्तीवर तितकाच हक्क असेन असे न्यायालय सांगते. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेले हे प्रकरण महाराष्ट्र रेल्वे पोलीस (Railway Police) दलातील एका उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याशी संबंधीत होते.

सुरेश हातणकर (Suresh Hatankar) हे महाराष्ट्र रेल्वे पोलीस (Mumbai Railway Police) दलात उपनिरीक्षक होते. सुरेश हातणकर यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला होता. 30 मे 2020 या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरस संकटाचा सामना करताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 65 लाख रुपयांची मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे हातणकर यांच्या कुटुंबीयांना 65 लाख रुपयांची मदत मिळणार होती. मात्र, सुरेश हातणकर यांच्या दोन पत्नी आहेत. दोन्ही पत्नींनी हातनकर यांच्या नावे मिळणाऱ्या राज्य सरकारच्या मदतीवर दावा सांगितला. पैकी, हातनकर यांच्या दुसऱ्या पत्नी न्यायालयात गेल्या.

हातणकर यांची दुसऱ्या पत्नीची मुलगी श्रद्धा हिनेही न्यायालयात धाव घेतली. वडिलांच्या मृत्यूनंतर आपली आणि आपल्या आईची आर्थिक फरफट होऊ नये. त्यामुळे वडिलांच्या नावे सरकारकडून मिळणाऱ्या मदतीतला वाटा आपल्यालाही मिळावा असे तिचे म्हणने होते.

हातणकर यांच्या दोन पत्नींच्या वादात आता मदतीची रक्कम नेमकी द्यायची तरी कोणाला? असा पेच राज्य सरकारसमो उभा ठाकला. दरम्यान, न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत मदतीची रक्कम ही उच्च न्यायालयात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा दाखलाही राज्य सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. (हेही वाचा, Hindu Succession Act Amendment 2005: वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क अबाधित, पालक वा मुलगी हयात नसल्यास वारसांना करु शकणार दावा- सर्वोच्च न्यायालय)

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाच्या एका निर्णयाप्रमाणेच निर्णय देत म्हटले की, ''एखाद्या व्यक्तिच्या दोन पत्नी असतील तर दुसऱ्या पत्नीला काहीही मिळणार नाही, असे कायदा सागतो. परंतू, पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीच्या मुलांना या रकमेतील वाटा मिळेल''.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या सुनावणी वेळी सुरेश हातणकर यांच्या पहिल्या पत्नी शुभदा आणि मुलगी सुरभी यांनी दावा केला की, हातणकर यांनी दुसरा विवाह केल्याची आपल्याला कल्पनाही नव्हती. मात्र, हातणकर यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी श्रद्धा हिचे वकीलांनी हा दावा फेटाळून लावला. तसेच, वकिलांनी सांगितले की, सुरेश हातणकर आणि आपले आशील (दुसरी पत्नी) व त्यांची मुलगी असे सर्वजण धारावीमधील रेल्वे पोलीस मुख्यालयात वास्तव्यास होते.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने सुरेश हातणकर यांच्या पहिल्या पत्नी आणि त्यांच्या मुलीला त्यांचे पती आणि वडील यांच्या दुसऱ्या विवाहाबाबत माहिती नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगवे अथवा तसे स्पष्ट करावे असे आदेश दिले. या खटल्याची सुनावणी मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.