Representational Image (Photo credits: PTI)

मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) 2026 च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत माहिती दिली. भोसले यांच्या मते, माणगाव-इंदापूर मार्ग, चिपळूणमधील बहादूर शेख परिसरातील कोसळलेल्या उड्डाणपुलाचे काम आणि संगमेश्वर-लांजा मार्ग यासह प्रमुख प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला आहे आणि ते जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साधारण 439 किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गाला गेल्या काही वर्षांत अनेक वेळा विलंब झाला आहे. पावसाळ्यात महामार्गाचे बांधकाम चर्चेचा विषय ठरते. प्रचंड वाहतूक कोंडी आणि खड्डेमय रस्त्यांमुळे कोकणात जाणे कठीण झाले आहे. अशात या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

भोसले म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम पूर्ण झाले असले तरी, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते रुंदीकरणाच्या प्रयत्नांना भूसंपादनाचे प्रश्न, पर्यावरणीय मंजुरी, कंत्राटदारांची अकार्यक्षमता, कायदेशीर वाद आणि बांधकाम आराखड्यात शेवटच्या क्षणी केलेले बदल यासारख्या अडचणी येत आहेत. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 17 वेळा महामार्गाला भेट दिली होती आणि गणेशोत्सव 2024 पूर्वी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, चिपळूण उड्डाणपुलावरील गर्डर कोसळल्याने प्रकल्पाला आणखी विलंब झाला.

आता, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये, भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे आणि महामार्गाच्या अपूर्ण भागांची स्वतः पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकींमध्ये त्यांनी चिपळूण उड्डाणपूल कोसळणे, कशेडी घाटातील समस्या, वडखळ नाका येथील वाहतूक कोंडी आणि पर्यायी सेवा रस्ते आणि अंडरपासची आवश्यकता यासारख्या प्रमुख अडचणींवर चर्चा केली. (हेही वाचा: Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात मोठे आंदोलन; 12 मार्च रोजी हजारो शेतकरी विधानभवनावर काढणार मोर्चा)

याआधी मागील महिन्यात भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाच्या अधिका-यांकडून त्यांनी या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, त्यासाठी आवश्यक बाबी यांची त्यांनी माहिती घेतली. ही कामे लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांतील अधिका-यांनी परस्पर समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करावेत अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिल्या.