
मुंबईतील (Mumbai) गेटवे ऑफ इंडिया (Gateway Of India) येथून मांडवा (Mandwa Jetty) या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश नागरिक बोटीने प्रवास करताना दिसून येतात. मात्र ऐन पावसाळ्यात मांडवा येथे जाण्यासाठी गेटवे येथून बोटी बंद केल्या जातात. तर पावसाळ्याच्या चार महिन्यात बंद असलेली बोटसेवा आजपासून (23 सप्टेंबर) पुन्हा मांडवा-गेटवे सुरु करण्यात आली आहे. मात्र सुरु करण्यात आलेली ही बोटसेवा फक्त अर्धवेळच असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईसह राज्यात अद्याप पावसाची परिस्थिती असल्याने गेटवे- मांडवा बोटसेवा यावेळी उशिराने सुरु केली आहे. नाहीतर गणेशोत्सवानंतर या ठिकाणची बोट सेवा साधारण सुरु करण्यात येते. बोटसेवा सुरु झाल्याने अलिबाग, मांडवा येथे प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण बोटसेवेसाठी तिकिट दरात 5 रुपयांची वाढ ही करण्यात आली आहे.
तसेच मुंबईतील भाऊचा धक्का येथून सुद्धा रेवदांडा येथे जाण्यासाठी फेरीची सोय प्रवाशांसाठी केली जाते. या ठिकाणी सुद्धा पावसाळ्यादरम्यान बोटसेवा बंद करण्यात येते. कारण पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे आणि पुराच्या भीतीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात येतो.(मुंबईकरांसाठी लवकरच उबर घेऊन येणार UberBOAT सेवा, स्पीडबोटने अवघ्या काही मिनिटात गाठू शकणार मांडवा, अलिबाग, एलिफंटा)
यापूर्वीसुद्धा गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात 31 तारखेला दुपार पासून ते 1 जानेवारी 2019 पर्यंतच्या सकाळ पर्यंत बोटसेवा बंद ठेवण्यात आली होती. यावेळी थर्टी फर्स्ट नाइटसाठी पर्यटकांची वाढती संख्या पाहून त्यांच्या सुरक्षिततेसाठी फेरी सेवा बंद करण्यात आली होती.