मुंबईकर ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात असा गणेशोत्सव (Ganeshotsav 2019) आता अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. अशावेळी भाविक मंडळीही गणेश दर्शनासाठी सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहून प्लॅनिंग करू लागले आहेत. वास्तविक मुंबईत दर दुसऱ्या गल्ल्लीत बाप्पा विराजमान होत असले तरी लालबाग परळ (Lalbaug- Parel), गिरगाव (Girgaon) मधील काही मानाच्या मंडळांना भाविकांची विशेष पसंती असते, साहजिकच या ठिकाणी मोठी गर्दी होते आणि अनेकांना तासनतास रांगेत तात्कळत उभे राहावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदा तुम्हाला केवळ 300 रुपयात या गणेश मंडळाची सैर करून देण्याचे आश्वासन देणारी एक ऑफर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पण थांबा या ऑफरने भुलून जाण्याआधी यामागील सत्य जाणून घ्या..
Whatsapp वर व्हायरल होणारा हा मॅसेज खरंतर एका खाजगी कंपनीकडून तयार करण्यात आला आहे आणि याबाबत कोणत्याही गणेश मंडळाला कल्पना नाही. या मॅसेजनुसार भाविकांना केवळ 300 रुपयात 'लालबागचा राजा'चे मुखदर्शन, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), चिंचपोकळीचा चिंतामणी, फोर्टचा राजा, गिरगावचा राजा, अखिल चंदनवाडी, केशवजी नाईक चाळ, खेतवाडीचा गणराज अशा आठ मंडळांच्या गणपतीचे दर्शन घडवले जाणार आहे. तसेच चहा-नाश्ता, पाणी अशीही सर्व सोय केली जाईल असे सांगितले आहे.
याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मंडळीनी केलेली नाही त्यामुळे अशा प्रकारे परस्पर ऑफर देणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मंडळांनी सांगितले आहे. (Ganeshotsav 2019: गणेशोत्सवाआधीच 'लालबागचा राजा'ला अग्निशामक दलाने पाठवले 17 लाखांचे बील; जाणून घ्या कारण)
व्हायरल पोस्ट
दरम्यान, या सूचनेनंतर लगेचच कंपनीने एक अन्य पोस्टर प्रसिद्ध करून आपण केवळ वाहतुकीचा संदर्भ देत ऑफर केल्याचे म्हंटले आहे, तसेच या ऑफर्सशी गणपती मंडळांचा काहीही संबंध नसल्याचे देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
कंपनीचा खुलासा
अनेकदा सोशल मीडियावरुन अशा प्रकारचे अनेक फॉरवर्ड मॅसेज फिरत असतात, मात्र अशा ऑफर मध्ये पैसे देण्याआधी नागरिकांनी योग्य टी तपासणी करणे आवश्यक आहे, तसेच संपूर्ण माहिती नसताना अशा प्रकारचे खोटे मॅसेज पसरवणे हे देखील कायद्याने गैर आहे.