Ganeshotsav 2019: गणेशोत्सवाआधीच 'लालबागचा राजा'ला अग्निशामक दलाने पाठवले 17 लाखांचे बील; जाणून घ्या कारण
लालबागचा राजा (Photo Credit : Wikimedia Commons)

मुंबई: गणेशोत्सव (Ganeshotsav 2019) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षीच्या गणपती उत्सवाला महाराष्ट्रातील पुराचे (Flood) गालबोट लागले असले तरी, मुंबई-पुणे शहरांतील मानाच्या गणपतींचा थाट दरवर्षीच पाहायला मिळतो. मुंबईमध्ये गणपती उत्सवाच्या काळात सर्वात जास्त गर्दी होते ती लालबागच्या राजासाठी (Lalbaugcha Raja). लालाबागचा राजा हा मुंबईमधील सर्वात महत्वाच्या गणपतींपैकी एक. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागतात. यावर्षीही अशीच परिस्थिती दिसून येईल म्हणून अग्निशामक दलाने या मंडळाला तब्बल 17 लाखांचे आगाऊ बील पाठवले आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दिवसाकाठी हजारो भाविक येतात. याकाळात चेंगराचेंगरी, मारामारी अशा दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा गोष्टी टाळण्यासाठी अग्निशामक दल या मंडळाला मदत करते. अग्निशामक दलाची गाडी 11 दिवस, चोवीस तास मंडळाच्या बाहेर उभी असते. अग्निशमन बंब तैनात केले असतात. अग्निशामक दलाचे कर्मचारी, जवान या मंडळाभोवती पहारा देत असतात. अशा प्रकारच्या सर्व सुविधेसाठी यावर्षी अग्निशामक दलाने तब्बल 17 लाखांचे बील पाठवले आहे. (हेही वाचा: गणेशोत्सव 2019 च्या मिरवणूकांदरम्यान कमजोर पुलांवर नाचणं टाळा; प्रशासनाचं गणेशभक्तांना आवाहन)

दोन वर्षांपूर्वी ही रक्कम अडीच ते तीन लाखांच्या घरात होती. मागच्यावर्षी देखील अग्निशामक दलाने इतके जास्त बील पाठवले होते, मात्र त्यावेळी स्थापत्य समितीमधील सदस्यांनी विरोध केल्यावर ते बील तीन लाख इतके आकारले गेले. मात्र यावर्षी पुन्हा 17 लाखांचे बील पाठवण्यात आले आहे.

बिलाची वर्गवारी –

पहिल्या तीन तासांकरिता - 10, 640 रुपये

त्या पुढील प्रत्येक तासासाठी - 3, 600

एकूण 264 तासांसाठी - 9 लाख 50 हजार 240 रुपये

जीएसटी व कर्मचाऱ्यांचा भत्ता मिळून हे बील 17 लाख 20 हजार इतके झाले आहे.

अशाप्रकारे पालिकेने ठरवून दिलेल्या नियमानुसार हे बील आकारण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे म्हणणे आहे. मात्र लालबागचा राजा मंडळाने यावर आक्षेप घेत, सार्वजनिक उत्सवांच्या वेळी सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे असे सांगत हे बील न भरण्याचा निर्णय घेतला आहे.