Mumbai Fire: माझगाव  जीएसटी भवनाला लागलेल्या आगीची कसून चौकशी होणार: अजित पवार
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

आज, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी मुंबईतील (Mumbai) माझगाव (Mazgaon) येथे स्थित जीएसटी भवनाच्या (GST Building) आठव्या मजल्यावर अचानक आग लागल्याने एकच गोंधळ पाहायला मिळाला होता, महसुलाच्या संबंधित अनेक महत्तवपूर्ण कागदपत्रे याठिकाणी असल्याने ही इमारत शासकीय दृष्ट्या बरीच महत्वाची आहे, त्यामुळे संबधित आगीच्या बाबत कसून चौकशी होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच अजित पवार यांनी थेट या परिसरात धाव घेतली होती यावेळेस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP)  पूर्वनियोजित बैठक अर्ध्यावर सोडून निघाले होते. जीएसटी भवनाला लागलेली आग ही तिसऱ्या स्तरावरील होती त्यामुळे ही आग विझवण्यासाठी तब्बल तीन तास अग्निशमन दलाच्या 20 गाड्या प्रयत्न करत होत्या, या आगीचे कारण अद्याप समजले नसले तरी यामध्ये अनेक महत्वाचे कागदपत्रे जाळून खाक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

अजित पवार यांनी आगीच्या बाबत प्रतिक्रिया देत, आपल्याला ज्यावेळेस संबंधित घटना घडल्याचे कळले तेव्हाच बैठक सोडून आम्ही याठिकाणी दाखल झालो, सर्व शासकीय डेटा हा कम्प्युटराइज्ड असतो त्यामुळे डेटा गहाळ झाल्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे आणि या प्रकरणी कसून चौकशी व्हावी असे आदेश दिल्याचे सुद्धा अजित पवार यांनी सांगितले आहे.

दुसरीकडे, भाजप नेते प्रवीण छेडा यांनी या घटनेमागे काहीतरी शिजतंय अशी शक्यता वर्तवली आहे. या इमारतीत आर्थिक कामाशी संबंधित कागदोपत्रे आहेत त्यामुळे कोणालातरी कोणत्यातरी घोटाळ्यातून वाचवण्यासाठी सरकारने ही आग स्वतःच लावून दिली नाहीये ना? असाही सवाल प्रवीण यांनी केला आहे.