Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून 5 हजारांच्या पार गेला आहे. तर मुंबईतील धारावीत (Dharavi) सुद्धा कोरोनाची लागण झाल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर धारावीत 25 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहेत. धारावीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 214 वर पोहचला आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून लॉकडाउनच्या (Lockdown) नियमाचे अधिक कठोर पालन येथे करण्यात येत आहे. तसेच धारावीत दाटीवाटीने लोकवस्ती असून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अश्यक आहे.

धारावीत गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या मदतीसाठी 150 डॉक्टरांच्या पथकाने कोरोनासंबंधित नागरिकांची स्क्रिनिंगच्या माध्यमातून चाचणी केली होती. तसेच धारावीतील सार्वजनिक शौचालये निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ केले होते. तरीही कोरोनाची नवे रुग्ण धारावीत आढळून येत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून नव्याने कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू होत आहे. बहुतांश मृत व्यक्ती हे 50 च्या वयातील असल्याचे दिसून आले आहे.(पुणे येथे 41 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा 61 वर- आरोग्य विभाग)

दरम्यान, लॉकडाउनचे आदेश राज्यात पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत दाटीवाटीने राहणाऱ्या परिसरात ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते. ऐवढेच नाही दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचे नियम अधिक कठोर असणार असल्याचे ही सांगण्यात आले होते.