Mumbai Crime: मुंबईत घरात घुसून मित्रावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून आरोपीचा हल्ला
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात शनिवारी पहाटे एका 30 वर्षीय व्यक्तीने त्याच्या मित्रावर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळी झाडल्याची घटना घडली आहे. आरोपी विवेक शेट्टीयार याने त्याचा मित्र आकाश स्वामी याच्या घरात घुसून तो झोपेत असताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत पीडित व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेनंतर या परिसरात मोठा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले.  (हेही वाचा - Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड मध्ये कुडाळवाडी भागात 150 भंगाराची दुकानं आगीत जळून खाक)

दरम्यान या घटनेनंतर आरोपी शेट्टीयार घटनास्थळावरून पळून गेला असून स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेत आहेत. पूर्व वैमनस्यातून आरोपीने हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. जखमी आकाश स्वामी सायन कोळीवाड्यात वास्तव्यास आहे. अलीकडेच 6 महिन्यांपूर्वी त्याला या परिसरात भाड्याने घर मिळाले होते. शनिवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास सायन कोळीवाडा चर्च परिसरात वास्तव्यास असलेल्या आकाश स्वामीवर आरोपी शेट्टीयारने देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळी झाडली.

गोळीबारात जखमी झालेल्या आकाशला शेजारी राहणाऱ्यानी त्याला जवळच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. सध्या आकाश स्वामिवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी शेट्टीयार गुन्हेगारी पार्श्भूमीचा असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत.