Mumbai: हॉटेलमध्ये साध्या फ्रीजमध्ये कोरोना विषाणू लस Covaxin ची साठवणूक; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले चौकशीचे आदेश
Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credit: ANI)

कोरोना विषाणू लसीच्या (COVID-19 Vaccine) कमतरतेमुळे सध्या महाराष्ट्रामध्ये 18-45 वयोगटातील लोकांचे लसीकरण बंद आहे. अशात कोरोना लसीची देखभाल करण्याबाबत दुर्लक्ष झाल्याचे एक प्रकरण मुंबईमधून (Mumbai) समोर आले आहे. रविवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी अंधेरी येथील हॉटेल्सची पाहणी केली. यावेळी त्यांना सील केलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) कोरोना लस एका सामान्य फ्रीजमध्ये ठेवलेली आढळली. ही गोष्ट निश्चित प्रक्रियेचे उल्लंघन आहे. हे पाहता महापौरांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

रविवारी महापौरांनी अंधेरी पूर्व येथील 'द ललित हॉटेल' ची पाहणी केली. यावेळी बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) चे काही अधिकारीही त्यांच्यासमवेत होते. नंतर पत्रकारांशी बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, स्थानिक खाजगी रुग्णालय आणि हॉटेल यांच्यात करार आहे, त्याअंतर्गत या लसी ठेवण्यात आल्या होत्या. ललित हॉटेलशी रुग्णालयाने करार केला होता, ज्यायोगे हॉटेलमध्ये लसीकरण केंद्र उभारून, लस दिल्यानंतर तेथे अशा लोकांना ठेवता येईल ज्यांची देखभाल करण्यास कोणी नाही.

या हॉटेलमध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रावर सुमारे 500 लोकांना लस दिली गेली आहे. आता घडलेल्या प्रकरणात, लसी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याच्या नियमांचे पालन करणे ही रुग्णालयाची जबाबदारी असल्याने हॉटेलला दोष दिला जात नाही. या रुग्णालयाने केंद्र सरकारकडून कोविड-19 लसीचे डोस मिळवले होते, ज्याची माहिती नागरी आणि राज्य अधिकाऱ्यांना नव्हती. (हेही वाचा: Nagpur: खासगी रुग्णालयाचा खोटारडेपणा उघड, 92 Covid-19 रुग्णांना द्यावे लागणार 10 लाख रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण)

किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, 'बर्‍याच बीएमसी सेंटरमध्ये कोव्हॅक्सिन डोस उपलब्ध नसताना या रुग्णालयाला ते कसे मिळाले याची चौकशी होईल. मला जे डोस मिळाले आहेत ते सामान्य फ्रिजमध्ये साठवले होते, ज्यामुळे लसीकरण झालेल्यांवर दुष्परिणाम होऊ शकतो. रिकव्हर केलेल्या लसी सील करून ताब्यात घेतल्या आहेत.'