मुंबईतील (Mumbai) खार परिसरात पोलिसांचे (Khar Police) एक धक्कादायक दुष्कृत्य उघडकीस आले आहे. खार पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या चार अधिकाऱ्यांनी सापळा रचण्याच्या उद्देशाने, कलिना भागात एका व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेवले आणि नंतर त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या कृत्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झळा आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली नसती तर पीडितेला आपले निर्दोषत्व सिद्ध करता आले नसते. सध्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगच्या आधारे पीडितेने आपले निर्दोषत्व सिद्ध केले असून त्याची सुटका करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती झोपल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तेवढ्यात काही पोलीस तिथे पोहोचतात. यावेळी एक पोलीस कर्मचारी त्याची समोरून आणि मागून झडती घेतो. मग तो स्वतःच्या मागच्या खिशातून ड्रग्जचे बंडल काढून पीडितेच्या खिशात टाकतो आणि नंतर त्याला अटक करतो. पोलिसांनी आरोप केला आहे की, पीडितेच्या ताब्यात 20 ग्रॅम मेफेड्रोन सापडले, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.
व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेऊन केली अटक-
𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲𝗺𝗲𝗻 𝗽𝗹𝗮𝗻𝘁 𝗱𝗿𝘂𝗴𝘀 𝗼𝗻 𝗮𝗻 𝗶𝗻𝗻𝗼𝗰𝗲𝗻𝘁 𝗺𝗮𝗻 | CCTV captures the deceit of Mumbai police officers, as they are seen putting a packet of drugs into the pocket of the man and arresting him. Investigations have begun against these officers. pic.twitter.com/d4O4fL4FUV
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) August 31, 2024
अहवालानुसार, पिडीत डॅनियल कालिनाम हा शाहबाज नावाच्या व्यक्तीसोबत काम करत होता आणि त्याचा पशुपालन फार्म होता. काही स्थानिक नेते आणि काही भूमाफिया या जागेवर लक्ष ठेवून होते. यावरून वाद सुरू होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच कारणासाठी डॅनियलला ड्रग्ज प्रकरणात अडकवून शाहबाजला धमकावण्याचा आणि गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता 30 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे. (हेही वाचा: शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांसाठी पैसे घेतले जात नाहीत; शिक्षण मंत्री कार्यालयाच्यावतीने स्पष्टीकरण जारी)
या व्हायरल व्हिडिओच्या आधारे 4 पोलिसांवर कारवाई करण्यात आली. याबाबत माहिती देताना डीसीपी झोन 9 राज टिळक रौशन म्हणतात, ‘आम्हाला व्हायरल व्हिडिओ मिळाला आणि त्यानंतर आम्ही तपास सुरू केला. आम्हाला व्हिडिओमध्ये असलेले चार लोक खार पोलीस ठाण्यातील असल्याचे आढळले. ते अधिकारी आणि हवालदार आहेत. व्हिडिओनुसार, त्यांनी कायद्याच्या प्रक्रियेचे पालन केले नाही आणि तपासणीचा संशयास्पद मार्ग प्रदर्शित केला. आम्ही त्यांना निलंबित केले आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे.’