मुंबईतील टीळक भवन (Tilak Bhavan कार्यालयात काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांमध्ये शिवीगाळ झाल्याचा प्रकार पुढे येत आहे. हे पदाधिकारी कोकण विभागातील असल्याची माहिती आहे. टिळक भवन येथे विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही मंडळी आज (शुक्रवार, 14 जून 2019) मुंबई येथे आली होती.
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, कांग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर खेकसले. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांना टिळक भवानातून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, या आधी उत्तर प्रदेश राज्यातही काँग्रेसमध्ये असा प्रकार घडला होता. पक्षाने बोलावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला होता. हाच प्रकार आता महाराष्ट्रातही पाहायला मिळतो आहे का? असा सवाल आता या प्रकारनांतर उपस्थित केला जात आहे. (हेही वाचा, बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी; राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेसची खेळी)
सध्या काँग्रेस पक्षासाठी अत्यंत अडचणीचा काळ आहे. अशा स्थिती पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अत्यंत जिद्द आणि चिकाटीने काम करण्याची गरज असताना पक्षाला सोडचिठ्ठी देण्यातच अनेक पक्षनेते कार्यकर्ते धन्यता मानताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्वात मोठी पोकळी पाहायला मिळत आहे. त्यातच आता पक्षात असलेले कार्यकर्ते, पक्षनेतेही एकमेकांसोबत उद्धट वर्तन करत असल्याने पक्षाची चिंता अधिकच वाढण्याची शक्यता आहे.