हार्बर मार्गावर जुन्या, कोंदट लोकल्स पाहायला मिळतात. याबद्दल प्रवासी वारंवार तक्रार करतानाही दिसतात. मात्र हार्बर मार्गावरील प्रवाशांचा हा त्रास लवकरच दूर होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हार्बर मार्गावर धावत असलेल्या जुन्या रेट्रोफिटेड लोकल्स बाद होणार असून त्याऐवजी सर्व सीमेन्सच्या लोकल धावणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पावसाळ्यात रुळांवर पाणी साचल्यानंतर त्यातून या गाड्या चालवणे अशक्य होते. तर कारशेडमध्ये दुरुस्ती या गाड्यांची दुरुस्ती करणेही कठीण होत असल्याने जुन्या रेल्वे ताफ्यातून बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच हार्बर मार्गावर सीमेन्सच्या लोकल धावतील.
हार्बर मार्गावर धावणाऱ्या रेट्रोफिटेड लोकल या डायरेक्ट करंट (डीसी) आधारीत होत्या. हार्बर मार्गावरील विद्युत प्रवाह डीसीतून अल्टरनेट करंट(एसी) केल्यानंतर या रेट्रोफिटेड गाड्यांमध्ये बदल करण्यात आले होते. मात्र सीमेन्स लोकल या साचलेल्या पाण्यातून धावण्यास सक्षम आहेत.
सध्या हार्बर मार्गावर 40 लोकल धावत असून त्यातील 36 सीमेन्सच्या आहेत. तर 4 रेट्रोफिटेडच्या आहेत. या 40 लोकलच्या दिवसभरात तब्बल 612 फेऱ्या होतात. मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच बंबार्डियर लोकल्स दाखल होतील. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणाऱ्या सीमेन्सच्या तीन लोकल हार्बर मार्गावर वळवण्यात येतील.