मुंबई लोकल रेल्वे (Local Train) प्रवास करताना पडून अथवा अपघात होऊन जीवे मरणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी नाही. त्या अपघातांसोबतच रेल्वेमार्गालगत थांबून प्रवाशांवर चोरीच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमध्येही जीव गमविणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशीच एक घटना मध्य रेल्वे मार्गावर ठाणे जिल्ह्यात असलेल्या दिवा स्टेशनवर (Diva Railway Station) घडली. दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाला चोरीच्या उद्देशाने चोरट्याने मारलेल्या फटक्यामुळे सदर प्रवासी खाली कोसळला आणि तो फलाट आणि पायदान यांच्या मध्ये पडला. ज्यामुळे त्याला आपला हात खांद्यापासून गमवावा लागला. या धक्कादायक प्रकारानंतर उपस्थित प्रवाशांनी चोरट्याला पकडून पोलीसांच्या हवाली केले. ही घटना रविवारी (18 फेब्रुवारी) रात्री 11.56 वाजता घडली.
फटका गँग सक्रीय
मुंबई मध्य रेल्वे मार्गावर चोरांची फटका गँग चांगलीच सक्रीय झाली आहे. याबाबत प्रवाशांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, हातात मोबाईल (Mobile) घेऊन उभ्या असलेल्या प्रवाशावर हल्ला करण्यापर्यंत या चोरांची मजल गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना चक्क दिवा रेल्वे स्टेशनमध्ये घडली. ज्यामध्ये पीडित प्रवाशाला कायमचे अपंगत्व आले आहे. हा प्रवासी केवळ 22 वर्षे वयाचा तरुण आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन फटका गँगवर कारवाई करवा अशी मागणी केली जात आहे. (हेही वाचा, Mumbai Central Railway: प्रवासांच्या सुरक्षिततेसाठी मध्यरेल्वे कडून निर्बंध; जाणून घ्या कोणत्या स्थानकांवर)
जीवावरचे हातावर निभावले
प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबई येथील शशिकांत कुमार हा 22 वर्षांचा तरुण वांगणी येथून ठाण्याच्या दिशेने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान तो हातात मोबाईल घेऊन रेल्वेच्या दरवाजात उभा होता. वेळ रात्रीची होती. साधारण रात्री 11.56 वाजता ठाण्याच्या दिशेने निगालेली लोकल दिवा स्टेशनमध्ये पोहोचली. दरम्यान, एका चोरट्याने शशिकांत यांच्या हातावर जोराचा फटका मारला. ज्यामुळे त्यांचा तोल जाऊ ते खाली कोसळले. ज्यामुळे त्यांचा हात रेल्वे आणि फलाट यांच्यामध्ये अललेल्या रिकाम्या जागेत अडकला आणि तुटला. खरेतर शशिकांत यांच्या जीवावरच बेतले होते. मात्र, हातावर निभावले. यामध्ये त्यांना अपंगत्त्व आले आहे. (हेही वाचा, Mumbai Central Railway AC Local: मुंबई मध्य रेल्वेवर मुख्य मार्गावर 10 एसी लोकल धावणार)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शशिकांत कुमार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच, तातडीने तपास करत गणेश शिंदे नामक चोरट्याला ताब्यात घेतले. गणेश हा 29 वर्षांचा आहे. सध्या त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी पोलीसही सतर्क झाले आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासन या घटनेनंतर नेमकी काय काळजी घेते याबाबत उत्सुकता आहे.