Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रावर कोरोना व्हायरसचे संकट ओढावले असून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांवर दिवसरात्र वैद्यकिय कर्मचारी उपचार करत आहेत. तरीही कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसागणिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तर मुंबईतील भायखळा येथील महिला कारागृहातील एका 54 वर्षीय कैदीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत भायखळा तुरुंग अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आर्थर रोड जेलसह 8 कारागृह पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती दिली होती.

भायखळा कारागृहातील 55 वर्षीय कैदीची पहिली कोरोनाची चाचणी जेव्हा 8 मे रोजी केली होती त्यावेळी ती निगेटिव्ह आली. मात्र दुसऱ्यांचा 9 मे रोजी पुन्हा तिची कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या सदर महिला कैदीला सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा मुंबईतील आर्थर रोड जेलमधील 77 कैदी आणि 26 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे नियम 10 ते 17 मे पर्यंत अधिक कठोर करण्यात येणार आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या विरोधात लढा द्यायचा असल्यास घरीच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य सरकारला कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही.