मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याचा ड्रिम प्रोजेक्ट अखेर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सत्यात आणला आहे. तर आता येत्या 27 तारखेपासून मुंबईत 24X7 काही सेवा सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. तत्पूर्वी मुंबईत नाईट लाईफ सुरु होण्यापूर्वी महापालिकेकडून याबबात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका, पोलीस, पर्यटन विभाग, उत्पादन शुल्क यांच्यासह अन्य विभागांवर महत्वाची जबाबदारी असणार आहे. पब आणि बार यांच्या वेळ मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच रात्री 1.30 वाजेपर्यंत असणार आहे. मात्र या दरम्यान नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर मुंबईमधील नाईट लाईफ प्रोजेक्टचा आजपासून आढावा घेतला जाणार आहे. यासाठी काही मॉलमधील काही उपहारगृह, मल्टिप्लेक्स आणि खरेदीसाठी दुकानं खुली ठेवली जाणार आहेत. नाईट लाईफ बाबत जाहीर केलेली नियमावली पुढीलप्रमाणे:
- रात्री 1.30 वाजल्यानंतर दारु विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दीड नंतर विक्री करताना कोणी आढळल्यास त्याचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द केला जाणार आहे. मॉल किंवा मिल मधील नाईट लाईफ मर्यादित काळापूर्ती सुरु राहणार आहे.
-जुहू चौपाटी, वरळी सी फेस, वांद्रे बॅन्डस्टॅंड, एनसीपीएस कॉर्नर, गिरगाव चौपाटी या ठिकाणी फूड ट्रक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र एकाच ठिकाणी 5 फूड ट्रक सुरु करण्यास परवानगी असून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील.
-नाईट लाईफ सुरु करण्यामागील मुख्य कारण म्हणजे पर्यटनाला चालना आणि रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. तसेच ज्यांना पोलीसांकडून सिक्युरिटी हवी असल्यास त्यांना देण्यात येईल. यामधून सुद्धा उत्पन्न मिळू शकते असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.
-तसेच ऑनलाईन पद्धतीने विक्री केल्या जाणाऱ्या गोष्टींची 24 तास डिलिव्हरी सुरु राहणार आहे.(मुंबई 24x7 सुरू ठेवण्याला प्रस्तावित वेळेआधीच होणार सुरूवात; प्रजासत्ताक दिन निमित्त विकेंडला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉल, मल्टिप्लेक्स मध्ये खास ऑफर्स!)
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई 24x7 हा प्रकल्प आशादायी असून यामधून मुंबईच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते अशी आशा व्यक्त केली आहे. दरम्यान यामुळे पोलिस यंत्रणेवर ताण येणार नाही याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या मुंबई 24 x7 प्रकल्पाची पुढचं भवितव्य ठरणार आहे. दरम्यान मुंबई 24 तास खुली ठेवण्याला सरकारचा पाठिंबा असला तरीही दुकानं खुली ठेवायची की नाही? त्याचा अंतिम निर्णय पूर्णतः मालकांचा आहे.