भाजप-शिवसेना युतीमध्ये सुरु असलेला तणाव कमी करण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्याची शक्यता
उद्धव ठाकरे आणि अमित शहा (Photo Credits: IANS)

विधानसभा निवडणूकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजप-शिवसेना महायुतीने (BJP- Shiv Sena Alliance) बहुमताचा आकडा पार केल्याचे दिसून आले. त्यानंतर शिवसेनेकडून भावी मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यावरुन आता भाजप-शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला असून 50-50 च्या प्रमाणे न झाल्यास आमच्याकडे सर्व मार्ग मोकळे आहेत असे उद्धव ठाकरे (Uddha Thackeray) यांनी विधान केले.

मात्र आता महायुतीअंतर्गत सुरु असलेला तणाव कमी करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला येत्या 30 तारखेला येण्याची शक्यता आहे. रविवारी दोन अपक्ष आमदारांचे समर्थन मिळाल्याने शिवसेनेचा आकडा 60 वर गेला आहे. तर येत्या 30 तारखेलाच देवेंद्र फडणवीस यांना आमदारकीच्या नेतेपदी निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील भाजपचे प्रवक्ता गिरीश व्यास यांनी नागपूर मध्ये मीडियासोबत बातचीत करताना असे म्हटले आहे की, शाह यांनी यापूर्वी सुद्धा उद्धव ठकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे. मात्र महायुतीमधील तणाव अधिक वाढू नये म्हणून अमित शहा उद्धव ठाकरे यांना भेटण्याची शक्यता आहे.(महाराष्ट्र विधानसभा सत्तेमध्ये समान वाट्यासाठी शिवसेना आमदार आक्रमक; अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची मागणी)

भाजप-शिवसेना महायुतीत निवडणूकीपूर्वी जागा वाटपावरुन वाद सुरु होता. त्यानंतर निकालानंतर आता मुख्यमंत्री पदाची कमान कोणाकडे असणार याच्यावरुन तणावाची स्थिती महायुतीत निर्माण झाली आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी ट्वीट करत वाघाच्या हातात कमळ असल्याचे व्यंगचित्र झळकवले होते. त्यामुळे आता शिवसेनेकडून भाजपची कोंडी करण्यात येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एवढेच नाही निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेना युवासेना प्रमुख आणि वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या विजयानंतर लगेच भावी मुख्यमंत्री तेच होणार असे पोस्टर मुंबईत झळकवण्यात आले होते.