BEST Bus Worker Strike (File Image)

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप (BEST Bus Workers) सुरुच आहे. मुंबई बेस्ट परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे मुंबईकरांचे मात्र हाल होत आहेत. कंत्राटी चालकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या (BEST Strike) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना संपामुळे कंपन्याकडून नोटीस देखील पाठवण्यास आता सुरवात झाली आहे. (हेही वाचा - BEST Bus Strike: मुंबई मध्ये सहाव्या दिवशीही बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा संप कायम; प्रवाशांचे हाल)

बेस्टच्या कंत्राटी कंपनी एसएमटी एटीपीएल असोसिएट कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोटीस ही बजावण्यात आली आहे. तात्काळ नोकरीवर रुजू व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई ही केली जाणार असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच शासकिय पातळीवर देखील आता संप मिटवण्यासाठी हालचाली या सुरु झाल्या आहेत. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळ हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. यावेळी ते आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडतील.

मुंबई मध्ये नोकरी, काम धंद्याला जाणार्‍यांना बेस्टच्या बसचा आधार होता. किफायतशीर दरामध्ये प्रवासी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतात. तसेच शाळकरी मुलांना देखील बेस्ट बसचा आधार होता. परंतू आता सार्‍यालाच खीळ बसला आहे. बेस्ट प्रशासन किंवा राज्य सरकार कडूनही अद्याप यावर कोणतीही बैठक आयोजित करून चर्चा झालेली नाही. आज यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचं आयोजन होण्याची शक्यता आहे.