मुंबई: BEST बसचा संप तूर्तास स्थगित; 26 ऑगस्टपासून वडाळा डेपोमध्ये धरणं आंदोलन
BEST Bus ( Photo Credits: commons.wikimedia )

मुंबईमध्ये बेस्ट कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. मुंबईत बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपावर (BEST Strike)  शनिवारी पुन्हा मतदान घेण्यात आले. त्यानंतर 98% कर्मचारी संपाच्या बाजूने राहिले आहेत. मात्र तूर्तास हा संप स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. बेस्टच्या संपामध्ये 17,925 कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. सध्या 26 ऑगस्टपासून मुंबईच्या  वडाळा डेपोमध्ये बेस्ट कर्मचारी धरणं आंदोलन सुरू करणार आहेत. तर 27 ऑगस्टच्या बेस्ट कृती समितीच्या बैठकीमध्ये कोणताच ठोस निर्णय न झाल्यास संप केला जाणार आहे. बेस्ट ने एका दिवसात 5 लाख प्रवाशांची वाढ करुन घडवला इतिहास, तिकिट दर कमी झाल्याने घडला हा चमत्कार

बेस्ट कर्मचार्‍यांनी वर्कर्स युनियन द्वारा एप्रिल 2016 पासून प्रलंबित वेतनवाढ, मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पामध्येच सहभागी करण्याचं आणि बेस्ट कर्मचार्‍यांना पालिका कर्मचार्‍यांइतका बोनस देण्याची मागणी करण्यात आली आहे. बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागणीचा विचार करता त्यांना मंगळवार (27 ऑगस्ट) दिवशी प्रशासनाद्वारा चर्चेचे आश्वासन देण्यात आलं आहे.

मुंबईकरांना वेठीस धरून बेस्ट कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्या पूर्ण करू नयेत असे वारंवार सांगण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी बेस्टचे तिकीटाचे दर कमी केल्याने बेस्टच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच बीएमसीच्या मदतीमुळे बेस्ट उपक्रमावरील कर्ज देखील हळूहळू कमी होत आहे.