मुंबई: 11 वर्षापासून पाणी चोरी करणाऱ्या 6 जणांच्या विरोधात आझाद मैदान पोलिसांची कारवाई
Water Supply | Representational Image | (Photo Credit: Facebooki)

मुंबईत पाणी चोरीचा प्रकार घडला असेल अशी घटना क्वचित पहायला मिळते. मात्र 11 वर्षांपासून पाणी चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात कारवाई केली असून त्याचा पुढील तपास करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.

आरोपी गेल्या 11 वर्षापासून भुजल पाण्याची चोरी करत असल्याचे सत्य समोर आले आहे. यामध्ये 6 जण सहभागी असून जवळजवळ 72.18 करोड रुपयांच्या पाण्याची चोरी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल करत कलम 370 आणि कलम 34 अंतर्गत कारवाई केली आहे. पाणी चोरीची जाग आता आझाद मैदान पोलिसांना आल्याने त्यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.(नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे 300 लीटर पाण्यावर डल्ला; अज्ञात पाणीचोरांवर गुन्हा दाखल)

तर गेल्या काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने डी आणि ई विभागात जल वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. तसेच रेसकोर्स, हाजीअली या भागात 1600 मिमि व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून पाणी गळतीची बाब प्रशासनाच्या ध्यानात आली होती. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता 11 वर्ष पाणी चोरी असल्याचा प्रकार समोर आल्यावर महानगरपालिका यावर काय तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तर नाशिक मध्ये ही भरुन ठेवलेल्या टाक्यांमधून पाणी चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे स्थानिकांवर पाण्याच्या टाक्यांना कुलप लावण्याची वेळ आली होती. या प्रकरणी एका स्थानिकाने थेट पोलिसात धाव घेत पाणी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.