Mumbai Rain Update: ऐन नाताळ सणाच्या दिवशी मुंबई उपनगरासह ठाणे व डोबिंवली परिसरात पावसाने आज हजेरी लावली आहे. या अचानक पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची भलतीच तारांबळ उडाली. अनेक जण नाताळ सण साजरा करण्यासाठी घराबाहेर पडले होते परंतु या पावसाने मात्र त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले.
मुंबईसह उपनगरात आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. त्यामुळे पाऊस पडणार तर नाही ना अशी भीती मुंबईकरांमध्ये होती. अखेर पावसाने अंधेरी, भांडुप, गोरेगाव, कांजूर, वडाळा, ठाणे, डोंबिवलीसह अनेक उपनगरीय भागात हजेरी लावली.
परंतु या अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते निसरडे झाले आहेत. याचा सर्वात जास्त फटका हा बाइकस्वारांना बसलेला पाहायला मिळाला आहे, कारण काही ठिकाणी बाइक घसरून काहींचे अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.
दरम्यान, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचा परिणाम झाल्याने म्हणजे अरबी समुद्रावरची आर्द्रता खेचून घेतली जात आहे. आणि या सर्वामुळेच मुंबईत पावसाने हजेरी लावली असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
तसेच महत्त्वाचे म्हणजे हा अवकाळी पाऊस पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागात कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.